भारतीय साखर हंगाम २०२१-२२ : इस्माकडून जानेवारी २०२२ मधील अपडेट जारी

नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनकडील (ISMA) अद्ययावत माहितीनुसार १५ जानेवारी २०२२ पर्यंत देशात ५०४ साखर कारखाने सुरू असून त्यांनी १५१.४१ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी, १५ जानेवारी २०२१ पर्यंत देशात ४८७ साखर कारखान्यांनी १४२.७८ लाख टन साखर उत्पादन केले होते. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा आजापर्यंत ८.६३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

महाराष्ट्रात १९२ साखर कारखान्यांनी १५ जानेवारी २०२२ पर्यंत ५८.४८ लाख टन साखर उत्पादित केली आहे. तर गेल्या वर्षी समान कालावधीत १८१ कारखान्यांनी ५१.५५ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. गेल्या वर्षीच्या या कालावधीअखेरच्या उत्पादनाच्या तुलनेत ७.२९ लाख टन जादा साखर निर्मिती झाली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये १२० साखर कारखाान्यांनी १५ जानेवारी २०२२ पर्यंत ४०.१७ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. २०२०-२१ मध्ये १५जानेवारी २०२१ पर्यंत इतकेच साखर कारखाने सुरू होते. त्यांनी ४२.९९ लाख टन साखर उत्पादित केली होती.

कर्नाटकमध्ये ७० साखर कारखाने सुरू असून त्यांनी १५ जानेवारी २०२२ पर्यंत ३३.२० लाख टन साखर उत्पादित केली आहे. तर २०२०-२१ या हंगामात ६६ कारखान्यांनी १५ जानेवारी २०२१ अखेर २९.८० लाख टन साखर उत्पादन घेतले होते.
गुजरातमध्ये १५ साखर कारखान्यांनी २०२१-२२ या हंगामात गाळप सुरू ठेवले असून त्यांनी १५ जानेवारी २०२२ अखेर ४.६० लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. गेल्यावर्षी, १५ जानेवारी २०२१ अखेर इतकेच कारखाने सुरू राहिले होते. त्यांनी त्या कालावधीत ४.४० लाख टन साखर उत्पादित केली होती.

तामिळनाडूमध्ये गेल्या वर्षी १५ जानेवारीपर्यतं सुरू राहिलेल्या २० कारखान्यांच्या तुलनेत यंदा २२ कारखाने सुरू आहेत. तामिळनाडूत कारखान्यांनी १५ जानेवारी २०२२ अखेर २.१० लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. तर गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत १.२३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. उर्वरीत राज्यांपैकी आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, ओडिसा यांनी सामूहिक रुपात १५ जानेवारी अखेर १२.५० लाख टन साखरेचे उत्पादन घेतले आहे.

भारतीय साखरेची निर्यात
बाजारातील अहवाल आणि बंदरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या कालावधीत जवळपास १७ लाख टन साखरेची निर्यात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत सुमारे ४.५ लाख टन साखर निर्यात झाली होती. याशिवाय, जानेवारी २०२२ मध्ये साधारणतः ७ लाख टन साखर निर्यात होण्याच्या प्रक्रियेत आहे.

ब्राझीलमध्ये आगामी हंगाम एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत अपेक्षेपेक्षा चांगला होण्याची शक्यता असल्याच्या वृत्तादरम्यान, जागतिक स्तरावर कच्च्या साखरेच्या दरात आणखी घसरण झाली आहे. सध्या हा दर गेल्या ५ महिन्यांच्या निच्चांकाच्या स्तरावर, जवळपास १८ सेंट प्रती पाऊंडवर आहे. भारतीय साखर कारखाने अद्याप योग्य वेळेची प्रतीक्षा करत आहेत. आतापर्यंत ३८-४० लाख टनाहून अधिक निर्यात करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here