नवी दिल्ली : हंगाम २०२१-२२ मध्ये देशातील ५१८ साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला. गेल्या वर्षीच्या ५०५ साखर कारखान्यांच्या तुलनेत यंदा १३ जादा कारखान्यांनी गाळप केले. ३१ मार्च २०२२ अखेर ३०९.८७ लाख टन साखर उत्पादन झाल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली. तर गेल्यावर्षी ३१ मार्च २०२१ पर्यंत २७८.७१ लाख टन साखर उत्पादन झाले होते. या हंगामात आतापर्यंत ३१.१६ लाख टन जादा साखर उत्पादन झाले आहे. यंदा ३१ मार्चअखेर देशात १५२ साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. तर ३६६ कारखाने अद्याप सुरू आहेत. या तुलनेत गेल्यावर्षी ३१ मार्च २०२१ अखेर २८४ साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले होते. तर २२१ कारखाने सुरू होते.
महाराष्ट्रात उच्चांकी ११४३ लाख टन ऊस गाळप
महाराष्ट्रात ३१ मार्च २०२२पर्यंत ११८.८१ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तर गेल्या वर्षी समान कालावधीत १००.४७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. सध्या २०२१-२२ या हंगाात ३० कारखान्यांनी आपले गाळप बंद केले आहे. त्यापैकी बहुतांश कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील आहेत. उर्वरीत १६७ कारखाने अद्याप सुरू आहेत. कारखान्यांनी आतापर्यंत ११४३ लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. राज्याच्या इतिहासात आतापर्यंतचे हे सर्वाधिक गाळप आहे. २०२०-२१ या हंगामात आतापर्यंत १०१४ लाख टन ऊस गाळप झाले होते. गेल्या हंगामात या कालावधीत ११४ कारखान्यांनी गाळप बंद केले होते. तर ७६ कारखाने सुरू होते.
उत्तर प्रदेशात साखर उत्पादन महाराष्ट्रापेक्षा कमीच
युपीमध्ये १२० कारखान्यांनी ३१ मार्च २०२२ पर्यंत ८७.५० लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. यापैकी ३२ कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील हे बहुसंख्य कारखाने आहेत. गेल्या वर्षी राज्यात एवढ्याच संख्येने कारखाने सुरू होते. ३१ मार्च २०२१ पर्यंत ९३.७१ लाख टन साखर उत्पादन झाले होते. तर ३९ कारखान्यांनी गाळप बंद केले होते.
कर्नाटकात आतापर्यंत सर्वाधिक साखर उत्पादन
कर्नाटकमध्ये ३१ मार्च २०२२ पर्यंत ७२ साखर कारखान्यांनी ५७.६५ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकमध्ये आतापर्यंत सर्वाधिक साखर उत्पादन झाले आहे. राज्यात ७२ पैकी ५१ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. २१ कारखाने अद्याप सुरूच आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत ६६ कारखान्यांनी ४२.३८ लाख टन साखर उत्पादन केले होते. गेल्या वर्षी ३१ मार्च २०२१ पर्यंत ६६ कारखान्यांपैकी ६५ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले होते.
गुजरातमध्ये १० लाख टन साखर उत्पादन
गुजरातमध्ये सध्या १५ कारखाने सुरू असून ३१ मार्चअखेर १० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी एवढेच कारखाने गाळप करीत होते. तर ५ कारखाने बंद झाले होते. ३१ मार्च २०२१ पर्यंत ९.१५ लाख टन साखर उत्पादन झाले होते.
तामिळनाडूसह उर्वरीत राज्यांत ३६ लाख टन साखर उत्पादन
तामिळनाडूमध्ये २८ कारखान्यांनी २०२१-२२ या हंगामात सहभाग घेऊन ६.८७ लाख टन साखर उत्पादन केले आहे. तर गेल्यावर्षी २६ कारखान्यांनी ५.०८ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. उर्वरीत राज्यांपैकी आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, ओडिशाने ३१ मार्चअखेर एकूण २९.०४ लाख टन साखर उत्पादन केले आहे. यापैकी बिहार, राजस्थानमध्ये गाळप संपुष्टात आले आहे. आंध्र प्रदेशात २, तेलंगणामध्ये ६, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी ९, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडीसामध्ये प्रत्येकी एक कारखान्याने गाळप समाप्त केले आहे.
२७ मार्चअखेर १३१.६९ कोटी लिटर इथेनॉल पुरवठा
इथेनॉलच्या आघाडीवर ४१६.३३ कोटी लिटर एकूण एलओआयच्या तुलनेत २७ मार्चपर्यंत १३१.६९ कोटी लिटर इथेनॉल पुरवठा करण्यात आला आहे. ओएमसींनी जारी केलेल्या ४१६ कोटी लिटर एलओआयच्या तुलनेत आतापर्यंत ४०२.६६ कोटी लिटरचे करार झाले आहेत. देशात डिसेंबर २०२१ पर्यंत ९.६० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे.
आतापर्यंत ७२ लाख टनाहून अधिक साखर निर्यात करार
अहवालानुसार, आतापर्यंत ७२ लाख टनाहून अधिक साखर निर्यातीचे करार करण्यात आले आहेत. यामध्ये मार्च २०२२ पर्यंत प्रत्यक्षात ५६-५७ लाख टन साखर निर्यात झाल्याची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार व्यावसायिकांकडून मिळालेल्या संकेतानुसार जागतिक बाजारपेठेत भारताकडून ८५ लाख टन साखर निर्यातीची अपेक्षा आहे.