नवी दिल्ली : चीनी मंडी
अतिरिक्त उत्पादनामुळे चिंतेत असलेल्या भारतातील साखर उद्योगासाठी एक आनंदाची बातमी आहे. चीनबरोबरच न्यूयॉर्कमधील साखर व्यापाऱ्यांशी भारताने साखर निर्यातीचा करार केला आहे. त्यामुळे चीन बरोबरच न्यूयॉर्कच्या बाजारातही भारताची साखर विकली जाणार आहे.
अतिरिक्त साखर उत्पादन हा भारतासाठी चिंतेचाविषय आहे. साखरेचे दर देशांतर्गत बाजारातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही घसरले असल्यामुळे या अतिरिक्त साखरेचा ‘गोडवा’ कमी झाल्याचे साखर उद्योगात बोलले जात आहे. भारत आता ब्राझीलला मागे टाकून जगातील क्रमांक एकचा साखर उत्पादक देश होण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भारताला आता २०१९मध्ये साखरेच्या नव्या बाजारपेठा शोधाव्या लागणार आहेत.
चीनसोबत भारताची चर्चा सुरू असून, आता न्यूयॉर्कच्या बाजारातही भारताची साखर विकली जाणार आहे. न्यूयॉर्कमध्ये भारताची साखर जाणे हे ब्राझील आणि ऑस्ट्रेलियातील साखर उद्योगासाठी धक्कादायक असल्याचे मानले जात आहे. गेल्या हंगामात सर्व साखर कारखान्यांना मिळून केवळ साडे चार लाख टन साखर निर्यात करता आली होती. साखरेचे दरच मोठ्या प्रमाणावर खाली घसरल्यामुळे निर्यात झाली नाही. आता या हंगामासाठी सरकारने कारखान्यांना ५० लाख टन साखर निर्यातीचे टार्गेट दिले आहे.
यंदा देशात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादन झाले असले, तरी तयार साखरेला कमी दरामुळे उठाव नाही. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आहेत. दुसरीकडे शेतकरी उसाला वाढीव दर मागत आहेत. कर्नाटकसह महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात शेतकरी जादा दरासाठी आंदोलन करत आहेत. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री एच. डी. देवेगौडा यांच्या मध्यस्थीनंतरही तोडगा निघालेला नाही. तेथे शेतकऱ्यांच्या मागील थकबाकीचाही विषय मोठा आहे. त्यामुळे मागण्या मान्य झाल्या शिवाय मागे न हटण्याचा निर्णय तेथील आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे.
साखर कारखान्यांनी केवळ एफआरपीची रक्कम देण्याची तयारी दर्शवली आहे. ती देणेही कारखान्यांना अवघड असल्याने त्याच्या वर शेतकऱ्यांना दर देण्यास असमर्थ असल्याचे कारखान्यांचे म्हणणे आहे. हा तिढा सोडवण्यासाठी कारखानदारांनी थोडा अवधी मागितला आहे.