भारताने २० जुलै रोजी गैर बासमती सफेद तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लागू करण्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याच्या किमतीत १५ टक्क्यांची वाढ झाल्याची चर्चा आहे. नेपाळमधील किरकोळ विक्री दुकानांमध्येही याचे परिणाम दिसू लागले आहेत. तांदळाच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. लोकांमध्ये दरवाढ, अपुऱ्या पुरवठ्याबाबत घबराटीची स्थिती आहे.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, किराणा व्यावसायिक रामशरण श्रेष्ठ यांनी सांगितले की, २५ किलो तांदळाच्या पोत्याची किंमत ३०० रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. रिेटेल ट्रेड असोसिएशनचे सचिव राजू मास्के यांच्या म्हणण्यानुसार भारताने जशी तांदूळ निर्यातबंदीची घोषणा केली घाऊक विक्रेत्यांनी तत्काळ दरवाढ केली आहे. दीड आठवड्यापूर्वी स्टीम जिरामसिनो तांदूळ १९०० रुपये पोते होता. आता तो २००० ते २१०० रुपयांना मिळत आहे.
दरम्यान, तांदळाच्या दरात वाढ केली नसल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. नेपाळ तांदूळ, डाळ, तेल उत्पादक संघाचे महासचिव दीपक कुमार पौडेल यांनी सांगितले की, आम्ही दरवाढ केलेली नाही. अद्याप तीन महिन्यांचा साठा शिल्लक आहे. तर मंत्री रिजाल यांनी सांगितले की, सरकारने बाजारातील तांदळाच्या दरवाढीबाबतच्या अफवांवर लक्ष ठेवले आहे. सरकार दरवाढ होऊ देणार नाही. पुरवठा अडचणीत येऊ नये यासाठी भारत सरकारशी चर्चा करण्यात येणार आहे. किती आयात करावी लागेल याचा आढावा घेतला जाईल.