नवी दिल्ली : अब्जाधिश उद्योगपती गौतम अदाणी यांनी आगामी दोन दशकात देशाची अर्थव्यवस्था १५ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला आहे. अदाणी ग्रुपच्या वार्षिक सभेत सोमवारी शेअर धारकांशी संवाद साधताना गौतम अदाणी यांनी सांगितले की, पुढील चार वर्षात देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर होण्याच्या मुद्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, वैयक्तिक स्तरावर मला असे वाटते की, हे उद्दीष्ट सहजपणे पूर्ण होईल. आगामी दोन दशकात अर्थव्यवस्थेचा आकार त्याच्या तिप्पट होऊ शकतो.
या वाटचालीत सातत्याने अडचणी येत आहेत, नेहमीच येत राहतील असे अदानी यांनी सांगितले. ते म्हणाले, सर्वात मोठा असलेल्या मध्यमवर्ग, काम करणाऱ्या युवा वर्षाची वाढती संख्या आणि ग्राहक या घटकांच्या आधारावर देशाच्या विकासाचे सकारात्मक चित्र दिसत आहे. कोरोनाच्या संकटाने देश आणि जगाला सर्वात चांगले धडे दिले आहेत. त्यापासून धडा घेऊन आपण अधिक बुद्धीमान बनू शकतो. गेल्या काही दिवसांत गैरसमजांमुळे कंपनीचे छोटे आणि मोठ्या शेअरधारकांना अडचणी आल्या. मात्र, आपला समूह अशा अडचणींतून धैर्याने मार्ग काढतो असे अदानी यांनी सांगितले.
कोरोना महामारीच्या आधी भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार २८९० अब्ज डॉलरचा होता. महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे सात टक्क्यांचे नुकसान झाले आहे.
यासंदर्भात अदानी म्हणाले, ग्राहक तसेच बाजारपेठेच्या गुंतवणुकीच्या अनुषंगाने भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. प्रत्येक महामारीच्या संकटात आपल्याला काहीतरी शिकायला मिळते. भारत आणि जगही कोविड १९च्या संकटातून अधिक सावधपणे वाटचाल करीत आहे असे मला वाटते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link