नवी दिल्ली : चीनी मंडी
अतिरिक्त साखर साठा निकाली काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारत सरकारने आशिया खंडातील चार देशांना साखर निर्यात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यात बांग्लादेश, चीन, कोरिया, मलेशिया या देशांचा समावेश आहे. त्यासाठी या चारही देशांना स्वतंत्र टीम पाठवण्यात येत आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली.
बांग्लादेश, चीन, कोरिया, मलेशिया या देशांना साखर निर्यात करण्याच्या आम्ही संधी शोधत आहोत. कारण, देशातील अतिरिक्त साठा निकाली काढण्याची गरज असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले. यामध्ये अन्न व नागरी पुरवठा खात्याचे शिष्टमंडळ बांग्लादेशला गेले आहे. कृषी मंत्रालयाचे शिष्टमंडळ मलेशियाला, तर वाणिज्य मंत्रालयाची शिष्टमंडळे चीन आणि दक्षिण कोरियाला जात आहेत.
यंदा भारतात अपेक्षेपेक्षा कमी साखर उत्पादन होणार असले, तरी साखरेचा अतिरिक्त साठा कायम राहणार आहे. हा साठा आताच विक्री केला नाही, तर भविष्यात घाऊक बाजारात साखरेचे दर आणखी खाली येण्याचा धोका आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या थकबाकीचा विषयही भविष्यात येणार आहे.
साखरेच्या २०१८-१९च्या हंगामात ३५० ते ३५५ लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज दी इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने व्यक्त केला होता. मात्र, काही महत्त्वाच्या राज्यांमधील प्रतिकूल परिस्थितीमुळे आता भारतात ३१५ ते ३२० लाख टन साखर उत्पादन होईल, असा सुधारीत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी कारखान्यांनी ३२३ लाख टन साखर उत्पादनाचा टप्पा पार केला होता.
शुगर मिल असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, साखरेचा नवीन हंगाम सुरू झाला असताना भारतात १०७ लाख टन साखर शिल्लक आहे. भारताची गरज साधरण २५५ ते २६० लाख टन साखरेची आहे. आता भारतातून ४० ते ५० लाख टन साखरेची निर्यात होण्याची शक्यता असून, पुढच्या वर्षी भारतात पुन्हा ११२ ते १२७ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहण्याचा अंदाज आहे.