नवी दिल्ली : वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये भारताची निर्यात २०२० मध्ये १६.१५ टक्क्यांनी वाढून २०.८७ बिलियन अमेरिकन डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी ही निर्यात १७.९ बिलियन डॉलर होती. चीनबरोबरची व्यापार तूट २०१९ मध्ये ५६.९५ बिलियन डॉलरवरून १९.३९ टक्के घटून २०२० मध्ये ४५.९१ बिलियन डॉलर झाली आहे.
गेल्या वर्षी द्विपक्षीय व्यापार ९२.८९ बिलियन डॉलरच्या तुलनेत २०२० मध्ये ५.६४ टक्क्यांनी घटून ८७.६५ बिलियनवर आला. कृषी क्षेत्रातील साखर, सोयाबीन, तेल आदी वस्तूंचा निर्यातीत मुख्य समावेश आहे. मात्र, आंबे, चहा, द्राक्षे या वस्तूंच्या निर्यातीत घसरण झाली. या आकडेवारीवर कटाक्ष टाकताना फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष एस. के. सराफ म्हणाले, ही आकडेवारी सकारात्मक आहे. स्थानिक निर्यातदारांतील स्पर्धा यातून दिसून येते.