वॉशिंग्टन डीसी : जागतिक बँकेने म्हटले आहे की, 2024 मध्ये दक्षिण आशियाचा विकास दर 6.0 टक्के राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या नवीनतम दक्षिण आशिया डेव्हलपमेंट अपडेटनुसार, भारताच्या सेवा आणि उद्योग क्षेत्रातील दमदार वाटचालीमुळे वित्तीय वर्ष 23-24 मध्ये भारताचा विकास दर दक्षिण आशियात सर्वात जास्त म्हणजे 7.5 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. दक्षिण आशियातील विकासाच्या शक्यता अधिक आहेत, परंतु नाजूक आर्थिक स्थिती आणि हवामान बदलाच्या संकटाचे काळे ढग अद्याप घोंगावत आहेत, असे मत जागतिक बँकेच्या दक्षिण आशियासाठीचे उपाध्यक्ष मार्टिन रायसर यांनी व्यक्त केले आहे.
जागतिक बँकेच्या अहवालात आर्थिक वर्ष 24-25 मध्ये पाकिस्तानची अर्थव्यवस्था 2.3 टक्के तर श्रीलंकेचा विकास दर 2025 मध्ये 2.5 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. बांगलादेशचा FY24- 25 चा ग्रोथ रेट 5.7 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. व्यापार मोकळेपणा आणि वित्तपुरवठ्यात वाढ, व्यावसायिक वातावरण, आर्थिक क्षेत्रातील निर्बंध हटवणे, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि रोजगाराला चालना देण्याची शिफारस केली आहे. या उपायांमुळे सार्वजनिक गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. यापूर्वी 27 मार्च रोजी, मॉर्गन स्टॅन्ले या संस्थेने आर्थिक वर्ष 2024-25 (FY25) साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज सुधारित केला. जो त्याच्या मागील अंदाजानुसार 6.5 टक्क्यांपेक्षा जास्त होता. कंपनीने चालू आर्थिक वर्ष, FY24 साठी 7.9 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.