नागपूर : बुटीबोरी औद्योगिक वसाहतीत ८८ एकर जागेवर देशातील सर्वांत मोठा डिस्टिलरी प्रकल्प उभारण्यात येत आहे. पेर्नोड रिकार्ड (Pernod Ricard) इंडियाने हा प्रकल्प नागपुरात स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी दोन वर्षांत या प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल. डिस्टिलरीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. २५०० कोटींची गुंतवणूक आणि ८०० पेक्षा जास्त रोजगार या प्रकल्पातून उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात पेर्नोड रिकार्ड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीन टुबूल आणि प्रधान सचिव (उद्योग) डॉ. हर्षदीप कांबळे यांनी करारावर स्वाक्षरी केली. उद्योगमंत्री उदय सामंत, उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पेर्नोड रिकार्ड इंडियाचे नॅशनल कॉपोर्रेट अफेअर हेड प्रसन्न मोहिले आणि वरिष्ठ उपाध्यक्ष (इंटिग्रेटेड ऑपरेशन्स) गगनदीप सेठी उपस्थित होते.
प्रकल्पात जवपासून ताजे माल्ट स्पिरिट उत्पादन होणार आहे. प्रकल्पात दररोज ६० हजार लिटर माल्ट स्पिरिटची निर्मिती होणार आहे. कंपनी शेतकऱ्यांकडून दरवर्षी ५० हजार टन जव खरेदी करेल, असे फडणवीस म्हणाले. पेनड रिकार्डच्या प्रकल्पामुळे राज्याच्या अबकारी शुल्कात वाढ होईल. प्रसन्न मोहिले यांच्यामुळे करार झाल्याचा उल्लेख फडणवीस यांनी आवर्जून केला.