नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण निर्यात वाढून ७७० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. त्यामुळे सरकारने आपले वार्षिक उद्दिष्टही गाठले आहे. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी गुरुवारी ही माहिती दिली. बर्थवाल यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आर्थिक वर्ष २०२३ चे उद्दिष्ट ७५० अब्ज डॉलर्सचे होते. त्यामुळे सरकारने निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा २० अब्ज डॉलर्सची जादा निर्यात झाली आहे. आधीच्या वर्षात, २०२२ मध्ये ६७६ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली होती. त्यामुळे जवळपास १४ टक्क्यांनी निर्यात वाढल्याचे दिसून आले आहे.
मनीकंट्रोल डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, वाणिज्य सचिवांनी सांगितले की, मंदीची स्थिती आणि परिस्थिती अनुकूल नसतानाही भारताने निर्यातीमध्ये वार्षिक ९४ अब्ज डॉलरची झेप घेतली आहे. या आर्थिक वर्षात एकूण व्यापारी निर्यात ४२२ अब्ज डॉलरची होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही निर्यात सहा टक्क्यांनी अधिक आहे. या आर्थिक वर्षात सर्व्हिसेसचा एक्स्पोर्टही २७.१६ टक्क्यांनी वाढून ३२३ अब्ज डॉलरनी झाला आहे. आधीच्या वर्षात तो २५४ अब्ज डॉलर होता.
पेट्रोलियम निर्यातीच्या आघाडीवर ४० टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. या कालावधीत इंजिनीअरिंग गुड्सस कॉटन, हँडलूम, प्लास्टिक आणि लिनोलियम, आयर्न, रत्न व आभूषणे या प्रकारच्या निर्यातीत काहीशी घसरण दिसून आली आहे. वाणिज्य तथा उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले की, वस्तू आणि सेवांच्या निर्यातीने नवा टप्पा गाठला आहे. २०२२-२३ मध्ये १४ टक्क्यांनी यात वाढ होवून निर्यात ७७० अब्ज डॉलरवर पोहोचली. आधीच्या वर्षी ती ६७६ अब्ज डॉलरवर होती. भारताच्या निर्यातीमधील वाढ शानदार आहे, असे त्यांनी रोममध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार या आर्थिक वर्षात आयातीमध्येही वाढ झाली आहे. एकूण १७.३८ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.