कोरोना महामारीच्या विनाशकारी प्रभावातून सावरत बाहेर पडण्यासाठी प्रगत अर्थव्यवस्था संघर्ष करत असतानाच भारतीय अर्थव्यवस्थेने अधिक लवचिकपणे पुन्हा उभारी घेतल्याचे मत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज व्यक्त केले. बंगळुरू येथे रेवा युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जिओपॉलिटिक्स अँड इंटरनॅशनल स्टडीजच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. भारत ही आधीच जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे आणि लवकरच ती जगातील तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे ते म्हणाले.
चालु आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर 7.3% राहिला असून 2047 पर्यंत भारत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी वेगाने मार्गक्रमणा करत असल्याचे यावरुन दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
जागतिक स्तरावर भारताच्या उंचावणाऱ्या स्थानाचा संदर्भ त्यांनी दिला. देशांतर्गत सामाजिक-आर्थिक यश आणि कल्याणकारी सुधारणांमुळे भारताची प्रतिष्ठा वाढत असल्याचं त्यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांत राज्यकारभारात मोठा बदल झाला आहे. 2014 पूर्वीच्या धोरण लकव्याच्या दिवसांपासून आताचे परिवर्तनात्मक धोरणांचे युग आपण पाहत असून त्याचा थेट फायदा नागरिकांना होतो आहे, असे ते म्हणाले.
गेल्या 10 वर्षातील देशाच्या कामगिरीवर त्यांनी प्रकाश टाकला. 2014 पासून 25 कोटींहून अधिक लोकांना दारिद्र्याच्या फेऱ्यातून बाहेर काढले आहे असेही पुरी यांनी नमूद केले. आयुष्मान भारत मिशन आणि स्वच्छ भारत मिशन, अमृत (AMRUT)सारख्या योजनांना यश मिळत आहे. , आरोग्यावरील खर्चात गेल्या दहा वर्षांत 25% घट झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
भारत लोकसंख्यात्मक संक्रमणाच्या उंबरठ्यावर उभा आहे, तर बहुतेक विकसित देशांना वय वाढत असलेल्या मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे, असे त्यांनी सांगितले. भारताची अफाट युवा लोकसंख्या आपल्याला अतुलनीय बौद्धिक भांडवल आणि उद्योजकीय प्रतिभा प्रदान करते असे ते म्हणाले.
जागतिक कृती या जागतिक हितासाठी असू शकतात या विश्वासाने भारताने वसुधैव कुटुंबकमच्या तत्त्वज्ञानाद्वारे एक नवीन जागतिक दृष्टी दिल्याचे त्यांनी सांगितले.
(Source: PIB)