नवी दिल्ली : देशांतर्गत तांदळाच्या वाढत्या किंमतीला आळा घालण्यासाठी भारताने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. नोव्हेंबरमध्ये पुढील पीक येईपर्यंत ही बंदी कायम राहू शकते, असे मानले जाते. मात्र भारताच्या या निर्णयामुळे जगात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे जगभरात तांदळाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे अनेक गरीब देशांच्या अडचणी वाढल्या आहेत.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, देशांतर्गत तांदळाचा पुरेसा पुरवठा कायम राहावा यासाठी सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली. देशाच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. पंजाबमध्ये भाताचे ६० टक्के नुकसान झाले आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि आसाममध्येही पिकांवर परिणाम झाला आहे. ही राज्ये बिगर बासमती तांदळाचे प्रमुख उत्पादक आहेत. त्यामुळे बंदीची कार्यवाही केली जेली. त्यापूर्वी सरकारने जूनमध्ये तांदळावर २० टक्के निर्यात शुल्क लावले होते.
भारताने २०२२ मध्ये ३९.५ लाख टन बासमती आणि १७२.७ लाख टन बिगर बासमती तांदळाची निर्यात केली. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये बासमती तांदळाच्या निर्यातीत घट झाली. यूएनकडील डेटानुसार, भारताने २०२० मध्ये १२ दशलक्ष टनांहून अधिक तांदूळ निर्यात केला. तर गेल्यावर्षी २१ दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला.
भारतातून सर्वाधिक तांदूळ चीन, बांगलादेश आणि नेपाळला निर्यात केला जातो. अनेक आफ्रिकन देशही भारतीय तांदळाचे मोठे खरेदीदार आहेत. यात आफ्रिकन देश बेनिन पहिल्या क्रमांकावर आहे. चीन, सेनेगल, आयव्हरी कोस्ट, टोगो, गिनी, बांगलादेश, नेपाळ, व्हिएतनाम आणि केनिया हे देशही तांदूळ खरेदीसाठी भारतावर अवलंबून आहेत.