भारत सरकारने तांदळाच्या निर्यातीवर बंदीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने बासमती तांदूळ वगळता इतर सर्व प्रकारच्या कच्च्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. देशांतर्गत मागणीत झालेली वाढ, आगामी सणासुदीच्या काळातील मागणी वाढीची शक्यता आणि किरकोळ विक्री दरावर नियंत्रणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदीचा मोठा परिणाम अमेरिकेतील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. तेथील सुपरमार्केटमध्ये नागरिक तांदूळ खरेदी करण्यासाठी रांगा लावत आहेत.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केंद्रीय अन्न मंत्रालयाने गेल्या आठवड्यात बासमती तांदूळ निर्यात धोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही असे सांगितले होते. म्हणजेच फक्त बिगर बासमती कच्च्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. भारतातून बासमती तांदळाची निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. देशांतर्गत किमतीत झालेली वाढ लक्षात घेऊन सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अमेरिकेत नागरिक तांदूळ खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अमेरिकेतील स्थानिक लोकांनी हे व्हिडिओ ट्वीट केले आहेत. काही लोक सुट्टी घेऊन तांदूळ खरेदीसाठी रांगा लावत आहेत. अनेक व्यक्ती दुकानात तांदळाची १०-१० पाकिटे खरेदी करताना दिसत आहे. येथे नऊ किलो तांदळाचे पॅकेट २७ डॉलर अर्थात २२१५ रुपयांना विकले जाते. सुपर मार्केटबाहेर लोक रांगा लावून तांदूळ खरेदी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.