मुंबई : भारतातून होणारी साखर निर्यात यंदा १२ टक्क्यांनी कमी होऊ शकते असे अनुमान आहे. कंटेनरच्या कमतरतेमुळे व्यापार मंदावला आहे. २०२१ च्या पहिल्या सहामाहीत भारताकडून होणारी कमी निर्यात प्रतिस्पर्धी असलेल्या ब्राझीलला दुसऱ्या सहामाहीत निर्यात वाढीसाठी फायदेशीर ठरेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लिमिडेचडे मुख्य व्यवस्थापक प्रकाश नाईकनवरे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, कंटेनरचा तुटवडा आपल्या निर्यातीत आडकाठी आणत आहे. आम्ही सुमारे ३ मिलियन टन साखर निर्यातीच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. मात्र, फक्त १ मिलियन टन साखर निर्यात होऊ शकेल इतके कंटेनर उपलब्ध आहेत. भारताकडून २०२०-२१ या हंगाात ५ मिलियन टनापर्यंत साखर निर्यात होऊ शकते. मात्र ही निर्यात गेल्यावर्षीच्या ५.७ मिलियन टन साखर निर्यातीपेक्षा कमीच आहे.
सरकारने निर्यातीसाठी दिलेल्या उद्दीष्टापेक्षा ही निर्यात कमीच आहे. केंद्र सरकारने यावर्षी ६ मिलियन टन साखर निर्यातीसाठी ५८३३ रुपये प्रतिटन अनुदान मंजूर केले आहे. नोव्हेंबर महिन्यापासून कंटेनर कमतरतेचा अनुभव येत आहे. २०२१ च्या पहिल्या सहामाहीत हा तुटवडा कायम असेल अशी शक्यता आहे. याच काळात भारत आपली बहूतांश साखर निर्यात करतो. जानेवारी २०२१ मध्ये भारतातून प्रामुख्याने अफगाणिस्तान, आफ्रिकेतील देश, इंडोनेशिया, श्रीलंका आदी देशांना ३००००० टन साखर निर्यात केली. ही निर्यात जानेवारी २०२०मध्ये करण्यात आलेल्या ७००००० टनापेक्षा खूपच कमी आहे.