नवी दिल्ली : चीनी मंडी
भारतात साखर उद्योगाला देण्यात आलेल्या अतिरिक्त साडे चार हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचा परिणाम आंतरराष्ट्रीय साखर उद्योगावर होताना दिसत आहे. विशेषतः या पॅकेजचा धसका ऑस्ट्रेलियातील साखर उद्योगाने घेतला आहे. ऑस्ट्रेलियन शुगर मिलिंग कौंन्सिलचे सीईओ डेव्हिड पिट्श यांनी भारताच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे गेल्या दशकातील निकांची पातळीवर असताना, भारत अशा पद्धतीने अनुदान देत असल्याने, चिंता वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डेव्हिड पिट्श म्हणाले, ‘आमच्या चिंतेची आणि कौन्सिलच्या विश्लेषणाची गंभीर दखल यापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या व्यापार मंत्र्यांनी तसेच विदेश व्यापार मंत्रालयाने घेतली आहे. सध्याच्या किमती ह्या ऑस्ट्रेलियातील साखर कारखान्यांच्या उत्पादन खर्चाच्याही ३० टक्के खाली आहेत. त्यावर तातडीने काही तरी उपाय योजना करण्याची गरज आहे. जागतिक बाजारात आणखी किमती घसरत असल्याने त्याचा फटका ऑस्ट्रेलियातील कोणतेही अनुदान न मिळणाऱ्या साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे.’
ज्या पद्धतीने भारत शेतकऱ्यांना आणि साखर वाहतुकीसाठी अनुदान देत आहे. त्या पद्धतीने भारत जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन करत आहे, असे मत डेव्हिड पिट्श यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘जागतिक व्यापार संघटनेतील भारत विरोधी ऑस्ट्रेलियाच्या भूमिकेला इतर साखर उत्पादक देशांचा पाठिंबा मिळवावा, अशी मागणी आम्ही ऑस्ट्रेलिया सरकारकडे करणार आहोत.’