नवी दिल्ली : चीनी मंडी
गेली दोन वर्षे उच्चांकी साखर उत्पादन करून ब्राझीलशी स्पर्धा करणाऱ्या भारतात पुढचा साखर हंगाम मात्र आव्हानात्मक असणार आहे. साखर पट्ट्यात विशेषतः पश्चिम भागात असलेल्या पाणी टंचाईमुळे यंदा उसाची लागवडच घटली आहे. त्यामुळे पुढच्या हंगामात भारतात गेल्या तीन वर्षांतील सर्वांत निचांकी साखर उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार २०१७-१८ या हंगामात भारतात ३२५ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदाच्या हंगामात भारतात ३१५ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण, प्रत्यक्षाता उत्पादन ३०० लाख टनांपेक्षा कमी होईल, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षी साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे दर जवळपास २१ टक्क्यांनी घसरले होते. आता भारतात साखरेच्या उत्पादनातच घट झाली तर, निश्चितच निर्यात कमी होणार आहे आणि जागतिक बाजारात साखरेच्या दरांवरही त्याचा परिणाम होईल. मुळात भारत कधी साखरेचा निर्यातदार असतो तर कधी आयातदार. देशातील साखरेच्या मागणीनुसार साखरेची निर्यात किंवा आयात अवलंबून असते.
या संदर्भात नाईकनवरे म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या काही भागात असलेल्या दुष्काळी स्थितीमुळे उसाची लागवड कमी झाली आहे. महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे साखर उत्पादक राज्य आहे. हीच परिस्थिती तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक साखर उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये आहे. तेथेही दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागत आहे.’
सरकारने ५० लाख टन साखर निर्यातीचे टार्गेट दिले आहे. पण, प्रत्यक्षात साखर निर्यात २५ ते ३० लाख टनांच्या आसपासच होण्याची शक्यता नाईकनवरे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘मार्च-एप्रिलमध्ये ब्राझीलची साखर आंतरराष्ट्रीय बाजारात येईल. तोपर्यंतच भारताचे निर्यात करार होतील. तसेच भारतात स्थानिक बाजारातील किमान विक्री दरात वाढ करण्यात आल्याने त्याचाही परिणाम निर्यातीवर होणार आहे
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApP