जकार्ता : इंडोनेशियामध्ये रमजानच्या आधी देशांतर्गत बाजारात पांढऱ्या साखरेच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सरकार अन्नसाठा वाढवण्यासाठी सुमारे २,००,००० मेट्रिक टन कच्ची साखर आयात करण्याची योजना आखत आहे, असे राष्ट्रीय अन्नसंस्थेने म्हटले आहे. सरकारने यावर्षी देशांतर्गत पांढऱ्या साखरेचे उत्पादन २.६ दशलक्ष टन आणि मागणी २.८४ दशलक्ष टन असण्याचा अंदाज वर्तवला आहे. राष्ट्रीय अन्न संस्थेचे प्रमुख आरिफ प्रसेत्यो आदि यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, फेब्रुवारीच्या सुरुवातीला इंडोनेशियामध्ये ८,४२,००० टन पांढऱ्या साखरेचा साठा होता. आम्हाला सरकारी साठ्याची पातळी वाढवायची आहे.
सांख्यिकी ब्युरोने म्हटले आहे की, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पांढऱ्या साखरेचे सरासरी दर १८,३६५ रुपये प्रति किलो होते. सरकारने निश्चित केलेल्या कमाल किमतीपेक्षा हे सुमारे ५ टक्के जास्त आहेत. याबाबत आरीफ म्हणाले की, सरकार आपल्या अन्नसाठ्याचा वापर बाजारात पुरवठा वाढवण्यासाठी, किमती कमी करण्यासाठी करू शकते. साखरेचा साठा पाच महिन्यांपर्यंतची मागणी पूर्ण करू शकतो आणि यावर्षी आयात हळूहळू होण्याची अपेक्षा आहे. त्यांनी सांगितले की अतिरिक्त आयात सरकारी मालकीच्या अन्न कंपन्यांना दिली जाईल. सरकारने यावर्षी औद्योगिक वापरासाठी ३.४ दशलक्ष टन कच्च्या साखरेचा आयात कोटा निश्चित केला आहे. इंडोनेशियाने पुढील चार वर्षांत अन्न स्वयंपूर्णता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.