जकार्ता : देशांतर्गत खाद्यपदार्थ आणि पेय उद्योगाने रिफाइंड साखरेच्या (refined sugar) वाढत्या किमतीची भरपाई करण्यासाठी या वर्षी अनेक उत्पादनांच्या किमती वाढविण्याचा विचार सुरू केला आहे. याबाबत इंडोनेशियाच्या फूड अँड बेव्हरेज प्रोड्युसर्स असोसिएशन (गॅपम्मी) ने म्हटले आहे की, या दरवाढीमुळे सिरप, सोडा, कुकीजसारख्या उत्पादनांवर परिणाम होईल.
गॅपम्मीचे अध्यक्ष अधी एस. लुकमान यांनी कोम्पस.कॉमच्या हवाल्याने म्हटले आहे की, साखरेच्या दरात एक वर्षाच्या तुलनेत ३० टक्क्यांची वाढ झाली आहे आणि आता आयात साखर स्थानिक साखरेच्या तुलनेत महाग आहे. ते म्हणाले की, या वर्षीच्या अखेरीस अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला अनेक कंपन्याआपल्या खाद्यपदार्थ आणि पेयांच्या किमतीचा आढावा घेतील. इंडोनेशियाच्या प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ उत्पादक पूर्णपणे आयात साखरेवर अवलंबून आहेत. स्थानिक white crystal sugar चा वापर औद्योगिक उत्पादनांसाठी केला जाऊ शकत नाही.
लुकमान म्हणाले की, थायलंड आणि भारत यांसारख्या साखर निर्यात करणार्या देशांमधील साखर निर्यातीतील बंदीमुळे जागतिक साखरेच्या दरवाढीत भर पडली आहे. ते म्हणाले की साखरेच्या तत्काळ पुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नाही कारण मोठ्या कंपन्या वार्षिक करारांतर्गत वर्षाअखेरपर्यंत ठराविक दराने साखर खरेदी करतात. त्यामुळे त्यांना काही काळ वाढीव किमतीपासून संरक्षण मिळते.
ते म्हणाले की, अन्न आणि पेय उद्योग साखरेपासून उत्पादनांच्या किमती किती प्रमाणात समायोजित करायच्या याचा काळजीपूर्वक विचार करेल. कारण याबाबत वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांशी चर्चा ही दीर्घ प्रक्रिया आहे. इंडोनेशियन ग्राहकांची किंमतीबाबत संवेदनशीलता लक्षात घेता, औद्योगिक साखरेच्या किमतीतील संपूर्ण वाढ भरून काढण्यासाठी वस्तूंच्या किमतीत वाढ करणे अव्यवहार्य ठरेल, असे ते म्हणाले.