नवी दिल्ली : साखरेच्या किमान विक्री किंमतीत (एमएसपी) वाढ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भारतातील सर्वात मोठ्या एकिकृत साखर उत्पादकांपैकी एक असलेल्या त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तरुण साहनी यांनी साखरेच्या ‘एमएसपी’मध्ये वाढ करण्याच्या मागणीला पाठबळ दिले आहे. ‘चिनीमंडी’ला दिलेल्या खास मुलाखतीत तरुण साहनी म्हणाले की, साखरेची ‘एमएसपी’ वाढवणे हे साखर उद्योगाच्या आर्थिक स्थिरतेसाठी खूप महत्त्वाचे आहे.
साहनी म्हणाले, एमएसपी २०१९ पासून अपरिवर्तित राहिली आहे, तर साखरेचा उत्पादन खर्च, विशेषत: उसाची वाजवी आणि मोबदला किंमत (एफआरपी), जी आता ३४० रुपये प्रती क्विंटल आहे, ती लक्षणीय वाढली आहे. साखरेच्या ‘एमएसपी’मध्ये वाढ करण्याच्या आपल्या भूमिकेचे समर्थन करताना, त्यांनी निदर्शनास आणले की, एफआरपीमध्ये सातत्याने झालेली वाढ आणि स्थिर एमएसपी, ही विसंगती साखर उद्योगावर लक्षणीय भार टाकत आहे, उद्योगाचा नफा कमी करत आहे आणि शेतकऱ्यांना वेळेवर बिले देण्याच्या क्षमतेत अडथळा आणत आहे.
ते पुढे म्हणाले की, देशातील साखरेचा वाढता वापर आणि देशांतर्गत उच्च उत्पादनाचा अंदाज पाहता, ‘एफआरपी’च्या तुलनेत एमएसपी वाढवणे महत्त्वाचे आहे. यामुळे उद्योगाला आर्थिक स्थैर्य मिळेल, शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण होईल आणि बाजारातील स्थिर साखर पुरवठा सुनिश्चित होईल. याचा शेवटी ग्राहकांनाही फायदा होईल.
२०१९ मध्ये साखरेचा एमएसपी प्रती किलो ३१ रुपये करण्यात आली. त्यावेळी देशात उसाची एफआरपी २७५ रुपये प्रती क्विंटल होती. तेव्हापासून, एफआरपीमध्ये सुमारे ६४ रुपये/क्विंटल (रु. ३४०/क्विंटलच्या नवीनतम वाढीसह) वाढ झाली आहे. एमएसपी मात्र अद्याप ३१ रुपये/किलोवर स्थिर आहे. एफआरपी आणि इतर बाबी लक्षात घेऊन एमएसपी निश्चित केला जात असल्याने, साखर कारखानदारांनी उत्पादन खर्चात वाढ कमी करण्यासाठी एमएसपीमध्ये तत्काळ वाढ करण्याची मागणी केली आहे.