महागाईचा भस्मासूर केवळ भारतच नव्हे तर जगभरातील अनेक देशांसाठी डोकेदुखी बनला आहे. जर आकडेवारी पाहिली तर दिसून येते की, बड्या-बड्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात महागाई कमी आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटॅटिक्सकडून सादर झालेल्या वार्षिक महागाईच्या आकडेवारीवर दृष्टिक्षेप टाकला असता जगात तु्र्कस्तान आणि अर्जेंटिना हे दोन देश महागाईने सर्वाधिक त्रस्त असल्याचे दिसते. या देशांमध्ये महागाईचा वार्षिक दर ८३ टक्के इतका आहे. नुकतेच वर्ल्ड ऑफ स्टॅटॅटिक्सने जगभरातील अनेक देशांतील महागाईच्या दराची आकडेवारी सादर केली आहे. यामध्ये तुर्कस्थान सर्वोच्च स्थानी आहे. तेथे महागाई ८३.४ टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यानंतर अर्जेंटिनाचा समावेश आहे. तेथे ८३ टक्के महागाईचा दर आहे.
आज तकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, महागाईच्या दरामध्ये नेदरलँड – १४.५ टक्के, रशिया – १३.७ टक्के, इटली ११.९ टक्के, जर्मनी १०.४ टक्के अशी क्रमवारी आहे. ब्रिटनमध्येही १०.१ टक्के इतकी उच्चांकी महागाई आहे. तर जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेत वार्षिक महागाईचा दर ८.२ टक्के इतका आहे. दक्षिण आफ्रिका ७.५ टक्के दरासह या यादीत वरच्या क्रमांकावर आहे. तर भारत १० व्या क्रमांकावर असून तेथे ७.४ टक्के दर आहे. भारतानंतर ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया येथे महागाई वाढली आहे. चीन, सौदी अरेबिया आणि जपानमध्ये महागाईचा दर कमी असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.