महागाईच्या आघाडीवर केंद्र सरकारला २०२३ या वर्षात पहिला जोरदार फटका बसला आहे. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर घसरुन ६ टक्क्यांखाली आला होता. त्यामुळे आगामी काळात महागाईपासून दिलासा मिळेल असे चित्र होते. मात्र, जानेवारी महिन्यात महागाईत गतीने वाढ झाली आहे. किरकोळ महागाईचा दर पुन्हा एकदा ६ टक्क्यांवर पोहोचला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या घसरणीनंतर २०२३ मध्ये किरकोळ महागाईच्या दराने झेप घेतली आहे. जानेवारीत किरकोळ महागाईा दर ६.५२ टक्के राहिला तर डिसेंबर २०२२ मध्ये हा दर ५.७२ टक्के होता. यापूर्वी देशातील औद्योगित उत्पादनाच्या आकडेवारीतही घसरण दिसून आली आहे. डिसेंबर २०२२ मध्ये हा दर ४.३ टक्क्यांवर राहिला. नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन ७.३ टक्के वाढले होते.
आजतकमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कन्झ्युमर प्राइज इंडेक्सवर आधारित महागाईचा दर डिसेंबर २०२२ मध्ये ५.७२ टक्के आणि जानेवारी २०२२ मध्ये ६.०१ टक्के होता. केंद्र सरकारने किरकोळ चलनवाढीचा दर २ टक्के अधिक किंवा उणे मार्जिनसह ४ टक्क्यांवर राहील याची खबरदारी घेणे रिझर्व्ह बँकेला बंधनकारक केले आहे. आता अन्नधान्यातील महागाईमुळे आकडे वाढताना दिसत आहेत. त्यामुळे महागाईचा दर डिसेंबरमधील ४.१९ टक्क्यांवरुन वाढून जानेवारीत ५.९४ टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून आले. खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. दूध आणि त्यांच्यापासून तयार होणाऱ्या पदार्थ्यांच्या महागाईचा दर जानेवारीत ८.७९ टक्के राहिला. मसाल्यांचा दरही वाढला आहे. भाजीपाल्याचा महागाई दर उणे आहे. हा -११.७० टक्के आहे. धान्य आणि दुधाच्या किमतीमधील वाढ सुरू आहे. आरबीआयने अलिकडेच रेपो रेटमध्येही २५ बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे.