बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
कोल्हापूर : चीनी मंडी
उसाचा एफआरपी दर, त्यानुसार होणारे ऊस बिल, जमा झालेली रक्कम आता शेतकऱ्यांना त्या त्या क्षणी थेट मोबाईलवर मिळणार आहे. साखर आयुक्तालय यासाठी एक विशेष अॅप तयार करत असून, या अॅपमुळे ऊस आणि साखरेची इत्थंभूत माहिती क्षणार्धात उपलब्ध होणार आहे. या अॅपमध्ये राज्यातील सर्व साखर कारखान्यांकडे असणाऱ्या सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या माहिती उपलब्ध होईल.
सध्या महाराष्ट्रात सहकारी आणि खासगी असे एकूण १८४ साखर कारखाने आहेत. कारखान्यांच्या सभासद शेतकऱ्यांना त्यांचा ऊस किती गाळप झाला, बिल किती मिळाले, कारखान्यांकडून किती पैसे येणे बाकी आहेत, याची माहिती घेण्यासाठी संबंधित कारखान्याच्या मुख्य कार्यालयात जावे लागते.
गावपातळीवर सहकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेडही थेट कारखान्याच्या बिलातूनच केली जाते. शेतकऱ्यांना बॅंकेत किती रुपये जमा झाले आणि सेवा संस्थेने किती कपात केली, याचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे अनेकवेळा शेतकरी गोंधळून गेल्याचे दिसते. याची दखल घेऊन राज्य सरकार साखर आयुक्तालयामार्फत एक विशेष अॅप घेऊन आले आहे.
सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा किती टन ऊस कारखान्याकडे आला, याची माहिती एसएमएसद्वारे कळते. पण, कोणत्या तारखेला किती ऊस गेला? सेवा संस्थेने बिलातील किती रक्कम कपात केली आणि बॅंकेत किती पाठवले, याचा ताळमेळ लागत नाही. साखर आयुक्तालयाच्या ‘ॲप’मधून सर्व माहिती एका क्लिकवर मिळाली तर शेतकऱ्यांसाठी ते सोयीचे होईल, असे मत ऊस उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.
ऊस बिलासह इतर माहिती शेतकऱ्यांना घरबसल्या मिळावी, यासाठी ॲप तयार केले आहे. त्याची यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. या ‘ॲप’मुळे शेतकऱ्यांना सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. ॲपमध्ये शेतकऱ्यांना बिल पाहण्यासाठी रजिस्टर मोबाईल क्रमांक किंवा सभासद क्रमांक टाकावा लागणार आहे. सध्या अॅपमध्ये काही त्रुटी आढळल्या असून, त्या दूर करण्यात येणार आहेत. ‘ॲप’मधील त्रुटी दूर झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांत ‘ॲप’चे काम सुरू होईल, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp