चंदीगड : पंजाबच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक दर मिळाल्याने खुशीचे वातावरण होते. मात्र, आता उसावर टॉप बोअरर रोगाच्या हल्ल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. ऊस हंगाम अधिकृतरित्या सुरू झाला असून शेतकऱ्यांनी पिकाची कापणीही सुरू केली आहे. अशा स्थितीत किडीचा पैलाव दिसला आहे.
याबाबत द ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, दसूया, टांडा आणि गुरदासपूरच्या काही भागात शेतकरी कमी उत्पादनामुळे नाराज आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला साधारणत ४४८ एकर क्षेत्रात लाल सड रोगाचा फैलाव दिसून आला होता. त्यामुळे गुरदासपूर, होशियारपूर, अमृतसर, जालंधर, पठाणकोट जिल्हा आणि लुधियानातील काही भागात पिकांचे नुकसान झाले आहे. दोआबा शेतकरी समितीचे अध्यक्ष आणि ऊस उत्पादक जंगवीर सिंह चौहान यांनी सांगितले की, आधी पिकाचे उत्पादन ३०० क्विंटल होते. मात्र, टॉप बोरर रोगामुळे ते २४० ते २५० क्विंटलवर आले आहे. कृषी विभागाने या रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हवा यासाठी उपाययोजना सुरू केल्याचे सांगितले. दरम्यान, यंदा पंजाब सरकारने एसएपीत वाढ करून प्रती क्विंटल ३६० रुपये दर केला आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ही घोषणा केली होती. राज्यात सात खासगी कारखान्यांनी हा दर देण्यास नकार दिला आहे.