कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊसतोडणी आणि वाहतूक कामगारांची लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळात नोंदणी करावी, असे निर्देश असे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी समाजकल्याण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांना दिले आहेत. ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करण्यास ग्रामसेवक संघटनेने विरोध केल्याने खासगी एजन्सीमार्फत ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करावे, असे पत्रात म्हटले आहे.
राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांसाठी २७ ऑक्टोबर, २०२० रोजी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या त्रिपक्षीय बैठकीत घेण्यात आला. या महामंडळाचे मुख्य कार्यालय ३ एप्रिल २०२२ रोजी पुणे येथे सुरू झाले. २०२२ चा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व कामगारांची नोंदणी करून ओळखपत्र देण्यात येईल, असे जाहीर केले. गावागावातील ऊस तोडणी वाहतूक कामगारांची ग्रामसेवकांमार्फत नोंदणी करून ओळखपत्र देण्याचे परिपत्रक वर्षापूर्वी काढले; मात्र या कामगारांचे मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे सर्वेक्षण करायचे असल्यामुळे ग्रामसेवकांनी नकार दिला. त्यामुळे एजन्सीमार्फत सर्वेक्षण करावे, अशी मागणी समाजकल्याण उपायुक्तांकडे केली आहे.