अहिल्यानगर : दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर अशोक सहकारी साखर कारखान्याने सभासदांच्या ठेवीवरील व्याज आणि कामगारांना ११ टक्के बोनस बँक खात्यात वर्ग केला आहे. अशोक उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे. कारखाना नवे तंत्रज्ञान वापरून झिरो पोल्युशनचे (शून्य प्रदुषण) उद्दिष्ट साध्य करीत आहे, अशी माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन हिम्मतराव धुमाळ यांनी दिली.
व्हाइस चेअरमन धुमाळ म्हणाले की, कारखान्यात १५ मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प कार्यान्वित आहे. शिवाय, प्रती दिन ४०,००० लिटर क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प व तेवढ्याच क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित आहे. २०२३-२४ च्या गळीत हंगामात नवीन ६० हजार लिटर क्षमतेचा डिस्टीलरी व ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प सुरू केला असून प्रती दिन १ लाख लिटर पर्यंत अल्कोहोल व प्रती दिन १ लाख लिटर पर्यंत इथेनॉलची निर्मिती होत आहे. नवीन इन्सिनरेशन बॉयलरमुळे प्रती तास २ मेगावॅट वीज निर्मिती होऊन त्यावर नवीन डिस्टीलरी, इथेनॉल प्रकल्प चालविला जात आहे.