नवी दिल्ली : दिल्लीस्थित युनिटी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि सुरुची फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन फर्म छत्तीसगढमध्ये इथेनॉल आणि वीज युनिट स्थापन करण्यासाठी २९५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. छत्तीसगढ सरकारने प्लांट स्थापन करण्यासाठी दोन्ही कंपन्यांसमवेत सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली आहे. दोन्ही प्रस्तावांनुसार राज्यात ९२० लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्योग विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, युनिटी इंडस्ट्रिजने मक्क्यावर आधारित इथेनॉल उत्पादनासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. कंपनीने १८३ कोटी रुपये गुंतवणुकीची तयारी केली आहे. आणि योजनेमधून साधारणतः १२० लोकांना रोजगार मिळेल. या इथेनॉल प्लांटची उत्पादन क्षमता १,२०,००० किलो लिटर प्रतीवर्ष (केएलपीए) असेल. अधिकाऱ्यांनीसांगितले की, हा प्लांट राज्यात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठीच्या राज्य सरकारच्या उपायांचा एक हिस्सा असेल. इथेनॉल उत्पादनासाठी तांदूळ, गहू, मक्का, ज्वारी अशा धान्याचा वापर केला जाईल.
केंद्र सरकार इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे इथेनॉल उत्पादनासाठी धान्यावर आधारित भट्ट्यांच्या उभारणीसाठी आणि सध्याच्या भट्ट्यांच्या विस्ताराच्या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. सुरुची फुड्सने पूरक पोषण उत्पादने आणि फोर्टिफाइड तांदळाच्या उत्पादनासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये कंपनी १११.७ कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या उद्योगातून ८०० लोकांना रोजगार मिळेल.