यह न्यूज़ सुनने के लिए इमेज के निचे के बटन को दबाये
नवी दिल्ली : चीनी मंडी
इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाअंतर्गत ७.५ टक्के इथेनॉल मिश्रित इंधनाचे लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे. यापूर्वी गेल्या वर्षी ४.२२ टक्के इथेनॉल मिश्रित इंधन मिळत होते. सध्या देशात इथेनॉलचे उत्पादन वाढण्याला बळ मिळू लागले आहे. देशाची सध्याची इथेनॉल क्षमता ३५५ कोटी लिटरची असू, साखर कारखान्यांनी २५० कोटी लिटर इथेनॉल विक्रीचे करार केले आहेत. त्यातील ५१ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठाही करण्यात आला आहे. इथेनॉलचा हंगाम डिसेंबरपासून सुरू होतो. त्यानंतरच्या तीन महिन्यांत ५१ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे.
सध्या देशात इथेनॉलचे उत्पादन वाढू लागल्याने इथेनॉल पुरवठ्याचा अंतिम आकडा हा अपेक्षेपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमात २०२२पर्यंत १० टक्के इथेनॉल मिश्रित इंधन पुरवण्याचे लक्ष्य आहे. त्यासंदर्भातील सूचना तेल कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. सरकारने २०३० पर्यंत देशात २० टक्के इथेनॉल मिश्रित इंधन पुरवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.
भारतात इथेनॉल मिश्रित इंधन पुरवण्याला २००१मध्ये सुरुवात झाली. इथेनॉल हे उसाच्या मळीचा उपपदार्थ असून, ते प्रामुख्याने पेट्रोलमध्ये मिसळले जाते. भारतात पेट्रोलची सरासरी मागणी ३ हजार ५०० कोटी लिटरची आहे. त्याच्या दहा टक्के इथेनॉल मिश्रण म्हणजेच ३५० कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. विशेष म्हणजे, इतक्या प्रमाणात इथेनॉल उपलब्ध होण्यासाठी भारत सक्षम होऊ लागला आहे. चांगली मागणी आणि दर यांमुळे साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मितीसाठी गुंतवणूक करू लागले आहेत.
इथेनॉल मिश्रणाला पाठिंबा देणं, हे भारताच्या दृष्टिनं फायदेशीर आहेत. गेल्या काही दिवसांत भारतात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणार झाले आहे. मागणी कमी असल्यामुळे दर घसरले आहेत. त्यामुळे भविष्यात साखरेचे करायचे काय, असा प्रश्न साखर उद्योगापुढे आहे. साखरेला मागणी नसल्याने कारखाने आर्थिक अडचणीत आले आहेत. परिणामी ऊस उत्पादकांची देणी थकली असून, त्यांच्यात रोष वाढत आहे. जर, इथेनॉलच्या उत्पादनावर भर दिला तर, येत्या काही दिवसांत साखरेचा अतिरिक्त पुरवठा, तुटवड्यात रुपांतरीत होऊ शकतो, जे साखर उद्योगाच्या दृष्टिने हिताचे आहे.
भारत ब्राझील पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. पण, इथेनॉल उत्पादनाच्या पातळीवर भारत पिछाडीवर आहे. अमेरिकेत इथेनॉलचे सर्वाधिक उत्पादन होते. त्या पाठोपाठ ब्राझील, युरोप, चीन, कॅनडा यांचा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये इथेनॉल मिश्रणाचा दर ४० ते ४५ टक्के आहे. या देशांमध्ये इथेनॉल पर्यायी इंधन म्हणून वापरले जाते. अर्थात भारताच्या तुलनेत या देशांमधील लोकसंख्या कमी आहे आणि त्यांच्याकडे पाणी भरपूर आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाला महत्त्व देत असल्यामुळे, भारतात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची हीच योग्य वेळ आहे का?, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो. त्यामुळे इथेनॉल क्षमता वाढवण्यासाठी कारखान्यांना अनुदान देणे योग्य आहे का? की, नव्या तंत्रज्ञानासाठी अनुदान वाढवण्याची गरज आहे?, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
डाउनलोड करे चीनीमंडी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp