नवी दिल्ली : चीनी मंडी
केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी इथेनॉल मिश्रण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत. एक तर, भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयातीवर अवलंबून आहे. देशाच्या एकूण गरजेच्या ८५ टक्के तेल आपल्याला आयात करावे लागते. दुसरीकडे भारतात गेल्या दोन वर्षांत साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले असून, त्याचा परिणाम बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. कमी दरामुळे साखरेची निर्यातही खोळंबली आहे. त्यामुळे साखरेसाठीचा ऊस इतरत्र वळवून उत्पादनावर नियंत्रण ठेवण्याचा हेतू आहे. उसाबरोबरच सरकार गोड ज्वारीसारख्या इथेनॉल तयार करणाऱ्या इतर पर्यायांचादेखील विचार करत आहे.
या पार्श्वभूमीवर वाहनांसाठी इंधन म्हणून इथेनॉलचा पर्याय खरच योग्य आहे का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. इथेनॉलच्या उत्पादनासाठी वापरली जाणारी कसदार जमीन, पाणी आणि त्याला पर्याय म्हणून पुढे आलेले उर्जेचे इतर स्रोत यांचा विचार करण्याची नितांत गरज आहे.
इथेनॉल निर्मितीसाठी उसाबरोबरच गोड ज्वारीचा पर्यायदेखील आहे. मुळात गोड ज्वारी हेदेखील उसासारखेच एक बहुउद्देशीय पिक आहे. एक तर, हे पिक थेट माणसाच्या अन्नापैकी एक आहे. दुसरीकडे त्याच्या गोड रसापासून इथेनॉल किंवा सिरप तयार करता येऊ शकतात. त्याचबरोबर त्याचा बगॅस किंवा कोंडा जनावरांसाठी खाद्य म्हणूनही वापरला जाऊ शकतो. त्यामुळे कमी जागेतून अन्न, इंधन आणि जनावरांचे खाद्य तयार करता येऊ शकते.
आणखी एक जमेची बाजू म्हणजे, गोड ज्वारी हे कमी पावसावर येणारे पिक आहे. उसाच्या तुलनेत त्याला ४० टक्के कमी पाणी लागते. तीन ते चार महिन्यांत हे पिक येत असल्यामुळे वर्षातून दोन पिके घेणे शक्य होते.
दुसरीकडे इथेनॉलचा वापर वाहनांसाठी इंधन म्हणून करणे म्हणजे उच्च दर्जाचे इंधन वाया घालवण्यासारखे आहे. अॅटोमोबाईल हे अत्यंत अक्षम गतीशील साधन आहे. त्याची कार्यक्षमता जगभरात प्रवाशांना विशिष्ट वेगाने वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एकूण उर्जेच्या केवळ एक-दोन टक्केच आहे. त्यामुळे आपण, उच्च दर्जाचे इथेनॉलसारखे रसायन आणि इतर जैव इंधने अॅटोमोबाईलसाठी वाया घालवत असल्याचे वाटते.
यासगळ्यात जैव इंधनापेक्षा इलेक्ट्रिक वाहने वाढवणे संयुक्तिक ठरणार आहे. ही वाहने तिप्पट चांगल्या क्षमतेची आहेत. आयसी इंजिनची २५-३० टक्के क्षमता असताना इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या डीसी मोटरची क्षमता ८० ते ९० टक्के असते. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहनांसाठी सौर ऊर्जेचावापरही शक्य आहे. त्यामुळे जैव इंधनावरील वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने १०० पटीने कार्यक्षम आहेत. एखाद्या पिकाची प्रकाश संश्लेषण क्षमता ही सरासरी ०.१ टक्के असते. तर, सौर ऊर्जेच्या पीव्ही मोड्युल्सची क्षमता १० टक्के असते.
इलेक्ट्रिक वाहनांचा विचार करता, त्याच्या बॅटरीच्या चार्चिंग आणि डिसचार्जिंगचाही विचार करायला हवा. सध्याच्या घडीला ३५ टक्के ऊर्जा ही चार्चिंग किंवा डिस्चार्जिंगच्या प्रक्रियेत वाया जाते.
जर, यासाठी बॅटरीजच्या जागी अल्ट्र कपॅसिटर विकसित केले तर, इलेक्ट्रॉनिक वाहनांची संपूर्ण व्यवस्थाच बदलून जाणार आहे. अर्थातच ते खर्चिकही असणार नाही. अल्ट्र कपॅसिटर हे चार्जिंग स्टोअर करणारी सिस्टिम आहे. हा स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्सचा भाग आहे. बॅटरीज ५ हजार ते १० हजारच्या सायकलनंतर अकार्यक्षम होतात. दुसरीकडे अल्ट्र कपॅसिटर चार्ज करण्यासाठी काही मिनिटांचा कालावधी लागतो. तर, बॅटरी चार्ज करण्यासाठी संपूर्ण रात्र द्यावी लागते.
संपूर्ण जगामध्ये आता जैव इंधनपेक्षा वेगळा पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारण, अन्न उत्पादनाशी त्याला स्पर्धा करावी लागते आणि महत्त्वाचे म्हणजे, ते परवडणारे नाही. जमिनीचा वापर केवळ अन्न आणि जनावरांसाठी चारा उगवण्यासाठी होण्याची गरज आहे. शेतीमधील नासाडीदेखील पुन्हा खताच्या रुपाने जमिनीतीच गेली पाहिजे. कसदार जमीन आणि मौल्यवान पाणी हे अॅटोमोबाईलसाठी लागणाऱ्या इंधनासाठी खर्च होऊ नये.
त्याचप्रमाणे गोड ज्वारीचा वापर देखील इथेनॉलपेक्षा सिरप तयार करण्यासाठी व्हावा. त्या सिरपमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंटस असतात. त्याचा वापर पोषण औद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. या सिरपना चांगली मागणी असल्याने शेतकऱ्यांनाही चांगला मोबदला मिळू शकेल.
मुळात पेट्रोलच्या किमती वाढल्या की लगेचच त्याच्या पर्यायी इंधनाची चर्चा होऊ लागते. पण, सातत्याने येणाऱ्या या प्रश्नाला कायमस्वरूपी पर्याय देण्याचा प्रयत्न ४०-५० वर्षांत सुरू आहे. त्याला अद्याप यश आलेले नाही.
गोड ज्वारीचा विचार केला तर, भारतातील अनेक डिस्टलरी युनिटस् त्यापासून इथेनॉल तयार करण्यात अपयशी ठरल्या आहेत. तेलंगणमधील एक आणि महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील एक अशा दोन ठिकाणी हा प्रयत्न फसला आहे. कारण, एकूण गोड ज्वारीच्या पिकातील मोठा हिस्सा हा जनावरांच्या खाद्याकडे वळवला गेला. अर्थातच चांगल्या कडब्याची किंवा चाऱ्याची कमतरता असल्यामुळे उत्पादन तिकडे गेले तसेच शेतकऱ्यांना कारखान्यांकडून चांगला मोबदला मिळत नसल्याचाही परिणाम दिसून आला. त्याचबरोबर चांगल्या बियाणाचाही तुटवडा आहे. कोणतिही बियाणे तयार करणारी कंपनी या गोड ज्वारी किंवा इतर हायब्रिड उत्पादनांकडे वळलेली नाही.
इथेनॉलचा विचार केला तर, जगात केवळ ब्राझीलमध्ये इथेनॉलचा प्रयोग यशस्वी झाला आहे. तेथे इथेनॉलचे उत्पादन १९७०पासून घेतले जाते. तेथील वाहने कोणत्याही प्रकारच्या इथेनॉल मिश्रणावर धावतात. तेथील इथेनॉल उद्योगातही मोठे चढ-उतार आहेत.
दरम्यान, भारतात मात्र साखर उद्योग खूप मोठी केमिकल क्रांती करेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. एका बाजूला साखरेचा वापर जगभरात कमी होत असल्याने साखर उद्योगातून साखर आणि इथेनॉल हे केमिकल उद्योगासाठी लाभदायक ठरू शकतात. तर, दुसरीकडे बगॅसच्या माध्यमातून वीज निर्मिती होऊ शकते. त्यामुळे ऊस केमिकल उद्योग आणि गाव किंवा तालुका पातळीवर वीज निर्मितीच्या माध्यमातून विकासाला हातभार लावू शकतो.