नवी दिल्ली : इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) ने DFPD च्या अन्न सचिवांना 28 मार्च 2024 रोजी लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून, चालू गाळप हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीस परवानगी देण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये ऊस आणि साखर उत्पादनात अपेक्षेपेक्षा चांगली झालेली वाढ आणि त्यामळे एकूण साखर उत्पादनात झालेल्या वाढीमुळे ISMA ने केंद्र सरकारकडे साखर निर्यातीचा आग्रह धरला आहे.
ISMA ने जानेवारी 2024 मध्ये 330.5 लाख टन साखर उत्पादनाचा प्रारंभिक अंदाज व्यक्त केला होता. पण ‘इस्मा’ने आता म्हटले आहे कि, देशातील एकूण साखरेचे उत्पादन (इथेनॉल उत्पादनाकडे साखर वळवण्याअगोदर) 340 लाख टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. अंदाजे 20 लाख टन साखर इथेनॉलकडे वळविल्यास, डिस्टिलर्सकडे उपलब्ध बी हेवी/इथेनॉलचा अतिरिक्त साठा याचा विचार करता चालू हंगामात साखरेचे निव्वळ अंदाजे उत्पादन 320 लाख टन होण्याची शक्यता आहे.
ISMA ने पत्रात म्हटले आहे कि, 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुमारे 56 लाख टनांचा शिल्लक साठा आणि हंगामासाठी 285 लाख टन देशांतर्गत वापर गृहीत धरल्यास 30 सप्टेंबर 2024 पर्यंत देशांतर्गत बाजारासाठी 91 लाख टनांचा साठा पुरेसा आहे. 2024-25 साठी उसाच्या रास्त आणि लाभदायक किमतीत (FRP) प्रति क्विंटल 25 रुपयांनी वाढ केल्याने देशात उसाच्या अधिक लागवडीला प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे उसाचा पुरवठा आगामी हंगामात वाढण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, हवामान संस्थांनी 2024 साठी भारतात एल निनोची स्थिती कमकुवत होण्याचा आणि दक्षिण-पश्चिम मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. ज्यामुळे 2024-25 मध्ये देशात चांगला पाऊस पडेल आणि उसाचे उत्पादन ही वाढेल.
या पार्श्वभूमीवर ISMA ने चालू हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीस परवानगी देण्याचा विचार करावा, असे आवाहन सरकारला केले आहे. निर्यातीमुळे साखर कारखान्यांसमोरील आर्थिक अडचणी दूर होतील आणि शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट करणे सोपे होईल, असेही पत्रात म्हटले आहे.