ISMA कडून २०२१-२२ या हंगामासाठी साखर उत्पादनाचा सुधारीत अंदाज जारी

इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) च्या म्हणण्यानुसार, २०२१-२२ यांदरम्यान, ५२२ साखर कारखान्यांनी त्यांचे गाळप केले. गेल्या वर्षी ५०६ कारखान्यांनी गाळप केले होते. यंदा जादा १६ कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला.
देशात ६ जून २०२२ पर्यंत ३५२.३७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, जे गेल्यावर्षी ६ जून २०२१ पर्यंत ३०७.४१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.तर ६ जून २०२२ पर्यंत, ४९३ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे आणि देशातील २९ साखर कारखान्यांचे गाळप सुरू होते. त्यापैकी बहुतांश महाराष्ट्रात आहेत. त्या तुलनेत गेल्यावर्षी याच तारखेला केवळ ४ गिरण्या सुरू होत्या.

देशभरातील साखर उत्पादकांच्या ISMA च्या समितीच्या ८ जून २०२२ रोजी झालेल्या बैठकीत देशातील ६ जून २०२२ पर्यंतचे साखर उत्पादनाचे अनुमान नोंदवले आहे.

तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये विशेष हंगाम सुरू असल्याने आणि चालू हंगामाच्या समाप्तीपर्यंत म्हणजेच ३० सप्टेंबर २०२२ पर्यंतच्या उर्वरित कालावधीसाठी या राज्यांमध्ये उसाची उपलब्धता चांगली असल्याने या राज्यांद्वारे एकत्रितपणे आणखी सुमारे ६ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे.

त्यानुसार, ISMA ने २०२१-२२ साठी ३४ लाख टन साखर इथेनॉलमध्ये वळविण्याचा विचार करून २०२१-२२ साठी ३६० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज सुधारित केला आहे. गेल्यावर्षी इथेनॉल निर्मितीसाठी सुमारे २० लाख टन साखर वळवल्यानंतर गेल्या वर्षी देशात ३११.९२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.

निर्यातीच्या आघाडीवर, आतापर्यंत सुमारे ९४-९५ लाख टन साखर निर्यात करार करण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यापैकी मे, २०२२ अखेरपर्यंत सुमारे ८६ लाख टन साखर प्रत्यक्ष निर्यात झाल्याची नोंद आहे. अलीकडेच, सरकारने चालू हंगामासाठी साखर निर्यात १०० लाख टनांपर्यंत मर्यादित करण्याची घोषणा केली आहे.

साखर कारखान्यांकडील अहवाल आणि ISMA ने जारी केलेल्या अंदाजानुसार, एप्रिल २०२२ अखेर साखरेची विक्री १६०.०५ लाख टन एवढी झाली आहे. गेल्या वर्षी ही विक्री समान कालावधीत १५२.६१ लाख टन होती. ती यंदा ७.५ लाख टनांनी जास्त आहे. याशिवाय, सरकारने जून २०२२ पर्यंत जाहीर केलेला देशांतर्गत साखर विक्री कोटा गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ५.५ लाख टनांनी जास्त आहे. या गोष्टींचा विचार करता, चालू हंगामात देशांतर्गत साखरेचा खप गेल्यावर्षीच्या २६५.५५ लाख टनांच्या तुलनेत २७५ लाख टन असेल, असे अनुमान ISMAने व्यक्त केले आहे.

हंगामाच्या सुरुवातीला, १ ऑक्टोबर २०२१ रोजी साखरेचा प्रारंभीचा शिल्लक साठा ८२ लाख टनाचा होता. देशांतर्गत साखरेचा वापर २७५ लाख टन असून १०० टन साखरेची होणारी निर्यात लक्षात घेतल्यास आणि यंदाच्या हंगामात ३६० लाख टनाचे अपेक्षित उत्पादन गृहित धरले तर हंगामाच्या अखेरीस, ३० सप्टेंबर २०२२ रोजी ६७ लाख टनाचा साठा शिल्लक राहिल. हा साठा तीन महिन्यांच्या देशांतर्गत वापरासाठी पुरेसा आहे.

दरवर्षीप्रमाणे ISMA कडून जून २०२२ च्या उत्तरार्धात देशभरातील उसाच्या क्षेत्राची उपग्रह प्रतिमांद्वारे पुढील वर्षीच्या पिक हंगामाचा, काढणीसाठी उपलब्ध असलेल्या उसाच्या एकरी लागवड क्षेत्राचा अंदाज घेईल. ISMAच्या देशभरातील सभासदांच्या बैठकीत याविषयी चर्चा केली जाईल आणि जुलै, २०२२ मध्ये २०२२-२३ या साखर हंगामासाठी उसाची उपलब्धता आणि साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज जाहीर करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here