कोल्हापूर : यंदाचा हंगाम अगदी अखेरच्या टप्प्यावर आला आहे. हा हंगाम साखर उद्योगाच्या दृष्टीने कठीण गेला. शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात तर घट झालीच, पण उत्पादन घटल्याने साखर कारखानेही पूर्ण क्षमतेने सुरू राहू शकले नाहीत. त्यामुळे अनेक कारखान्यांना अपेक्षित साखर उत्पादन करता आले नाही, परिणामी व्यवस्थापन खर्चात वाढ झाली. मात्र, यंदा ऊस लागवडीत वाढ झाल्याने आगामी हंगामात मात्र पुरेशा साखर उत्पादनाची अपेक्षा इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केली आहे. हवामान खात्यानेही दमदार मॉन्सूनची शक्यता व्यक्त केल्याने यंदा उसाची वाढ चांगली होईल, अशी शक्यता आहे.
यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर सुमारे ६० लाख टनांनी कमी होण्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीत उत्तर प्रदेशातील वीस साखर कारखाने वगळता अन्य राज्यांतील गळीत हंगाम पूर्णपणे संपला आहे. अशावेळी इस्माने पुढील हंगामाविषयी सकारात्मक चित्र दिसेल असे म्हटले आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे उसाच्या लागवडी वाढल्या आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक या तिन्ही प्रमुख साखर उत्पादक राज्यांमध्ये पुढील वर्षासाठी लागवडी वाढल्या आहेत. भारतीय हवामान विभागासह अन्य संस्थांनी येणारा पावसाळी हंगाम सामान्य असेल, अशी शक्यता वर्तवली आहे. प्राथमिक अंदाजानुसार येणारा हंगाम ऑक्टोबरला म्हणजे वेळेतच सुरू होईल. दक्षिण कर्नाटक व तमिळनाडूतील काही कारखाने जुलै ते सप्टेंबरमध्ये विशेष हंगाम चालवतील. यामुळे एकूण उत्पादनात चार ते पाच लाख टन साखरेची वाढ होऊ शकते, असे इस्माचे म्हणणे आहे.