कोइंबतूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने ऊसाच्या नव्या प्रजाती विकसित करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद-ऊस प्रजनन संस्था ( Indian Council of Agricultural Research-Sugarcane Breeding Institute) सोबत एक सामंजस्य करारावर (MOU) स्वाक्षरी केली आहे. चांगले उत्पादन आणि साखरेचा उच्च उतारा मिळेल असा याचा उद्देश आहे. असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी ‘द हिंदू’ला सांगितले की, आगामी पाच वर्षांच्या या योजनेत २५ साखर कारखाने सहभागी होतील. आणि उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये उपयुक्त यशस्वी प्रजाती दरवर्षी शेतकऱ्यांसाठी वितरीत केली जाईल.
त्यांनी सांगितले की, या योजनेमध्ये ७.५ कोटी रुपयांचा आर्थिक खर्चाचा समावेश आहे. आणि हे साखर कारखान्यांना इथेनॉलच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी गरजेचे आहे. आता आमच्याकडे साखर आणि इथेनॉलचा देशांतर्गत खप आणि निर्यात याचे चांगले संतुलन आहे. आम्ही उसाचे उत्पादन आणि रिकव्हरी वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आता सरासरी उत्पादन ८० टन प्रती हेक्टर आहे. आणि योजनेत हे उत्पादन १०० टनापर्यंत नेण्याचे प्रयत्न आहेत. सद्यस्थितीत रिकव्हरी १०.८५ टक्के असून उद्दिष्ट ११.५ टक्के आहे. उत्पादन वाढल्यास शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल.
संस्थेने दिलेल्या निवेदनानुसार, ऊस संशोधन संस्थेच्या संचालक जी. हेमप्रभा यांनी सांगितले की, या योजनेत देशातील विविध क्षेत्रांमधील साखर कारखान्यांमध्ये विशिष्ट उसाचे क्लोनचे मूल्यांकन केले जाईल. उत्पादन आणि गुणवत्ता क्षमतेसाठी ४० पेक्षा अधिक क्लोनचे परिक्षण केले जाणार आहे. असोसिएशनने आणखी एका योजनेबाबत सामंजस्य करार केला आहे.