कोल्हापूर : केंद्राने बी हेवी मोलॅसीस, साखर व उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला परवानगी दिली आहे. मात्र इतर पद्धतीने इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध उठविल्यास ३२ ते ३३ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होऊ शकते, असा विश्वास इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केला आहे. यानंतर ‘इस्मा’ने सार्वजनिक वितरण विभागाला पत्र दिले आहे. यापूर्वी ‘इस्मा’ ने हंगामाच्या पूर्वी ३३० लाख टन साखर तयार होईल, असा अंदाज व्यक्त केला होता; पण हंगामाच्या शेवटी हा अंदाज ३४० लाख टन साखरेपर्यंत वाढला आहे.
देशात अंतिम टप्प्यात साखर उत्पादन वाढत असल्याने केंद्राने इथेनॉल निर्मितीवरील बंधने शिथिल करावीत, अशी मागणी साखर उद्योगातून केली जात आहे. महाराष्ट्र व कर्नाटकात यंदा अंदाजापेक्षा जास्त उत्पादन होत असल्याचे ‘इस्मा’ने पत्रात म्हटले आहे. इथेनॉल प्रकल्पांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उत्पादनास परवानगी देण्याची मागणी केली आहे. केंद्राने डिसेंबरमध्ये इथेनॉलसाठी उसाचा रस, बी हेवी मोलॅसीसचा वापर बंद करण्याचा आदेश देऊन १७ लाख टन साखरेपासून इथेनॉल तयार करण्याच्या सूचना दिल्या. आता सुधारित अंदाजानुसार १० लाख टन साखर अतिरिक्त मिळून याचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी होऊ शकतो, असे पत्रात म्हटले आहे. सद्यस्थितीत देशातील १६२ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर गेल्यावर्षी, १५ मार्च, २०२३ अखेर देशातील २०८ साखर कारखाने बंद झाले होते.