हिजबुल्ला युद्धात सामील झाल्यास लेबनॉनला ‘उद्ध्वस्त’ करण्याची इस्रायलची धमकी

नवी दिल्ली : इस्रायलच्या सैन्याने दक्षिण गाझामध्ये युद्धविराम केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. इजिप्तमधील रफाह क्रॉसिंग हे युद्धग्रस्त गाझामधील लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या एकमेव मार्गाचीही इस्रायलने नाकाबंदी केली आहे. इस्रायलने दोन सीमा अगोदरच बंद केल्या आहेत आणि गेल्या आठवडाभरापासून रफाह क्रॉसिंगही बंद आहे. इस्रायलच्या सैन्याने हमासची चारही बाजूंनी कोंडी केली आहे. त्याचबरोबर इस्रायलने इराण समर्थित हिजबुल्ला युद्धात सामील झाल्यास लेबनॉनला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे.

इस्रायलने हमास-शासित गाझा पट्टीवर बॉम्बफेक केल्यामुळे आणि जमिनीवरून हल्ला करण्यासाठी सोमवारी सैन्यांची जमवाजमव सुरू ठेवली होती. गेल्या दहा दिवसात गाझामधील दहा लाखांहून अधिक लोकांनी आपली घरे सोडली आहेत. इस्रायलने गाझावर बॉम्ब हल्ला सुरूच ठेवल्यामुळे आतापर्यंत किमान 2,670 सर्वसामान्य नागरिक मारले गेले आहेत.

इजिप्तने सोमवारी आरोप केला कि, इस्राइल गाझाला मदत पोहोचविण्यात आणि परदेशी पासपोर्ट धारकांना एकमेव प्रवेशद्वारातून बाहेर काढण्यात सहकार्य करत नाही, त्यामुळे शेकडो टन अन्नधान्य पुरवठा अडकून पडला आहे. इजिप्तचे म्हणणे आहे की, रफाह क्रॉसिंग इस्रायलकडून सुरु असलेल्या हवाई हल्ल्यांमुळे निष्क्रिय झाला आहे.

परदेशी पासपोर्ट धारकांना सोडण्यासाठी आणि वेढलेल्या पॅलेस्टिनी प्रदेशात मदत आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर सोमवारी इस्रायली सैन्याने गाझावर बॉम्बफेक सुरूच ठेवली. हमास शासित गाझातील रहिवाशांनी सांगितले की, रात्रीचे हवाई हल्ले आतापर्यंतचे सर्वात मोठे हल्ले होते. दिवसभर बॉम्बस्फोट सुरूच होते आणि अनेक इमारती कोसळल्या, ढिगाऱ्याखाली शेकडो लोक अडकल्याचे त्यांनी सांगितले.

इस्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईनला पाठींबा दर्शविण्यासाठी खासदार दानिश अली आणि माजी खासदार मणिशंकर अय्यर आणि केसी त्यागी यांच्यासह विरोधी नेत्यांच्या गटाने सोमवारी पॅलेस्टाईन दूतावासाला भेट दिली. भेट देणाऱ्यांमध्ये बसपचे अली, काँग्रेसचे अय्यर आणि जेडी(यू)चे त्यागी, सीपीआय (एमएल) सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य आणि समाजवादी पक्षाचे खासदार जावेद अली खान यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here