नवी दिल्ली : इस्रायलने सोमवारी सांगितले की, त्यांनी गाझामध्ये रात्रभर जमिनीवरून तीव्र हल्ले केले आहेत. इस्रायलने 7 ऑक्टोबर 2023 च्या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या हमास अतिरेक्यांच्या शोधात आपले हल्ले सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इस्रायलच्या सततच्या हल्ल्यामुळे भीतीच्या छायेत असणाऱ्या हजारो लोकांनी गाझामध्ये यूएन रिलीफ अँड वर्क्स एजन्सीच्या गोदामांमध्ये गव्हाचे पीठ आणि मूलभूत वस्तू मिळवण्यासाठी लुटालूट केली. गाझामधील यूएनआरडब्ल्यूए प्रकरणांचे संचालक थॉमस व्हाईट म्हणाले की, नागरी सुव्यवस्था ढासळू लागल्याचे हे चिंताजनक लक्षण आहे.
वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने हल्ला सुरू केल्यापासून गाझामधील मृतांची संख्या 8,000 पेक्षा जास्त झाली आहे. यामध्ये 3,324 मुले, 2,062 महिला आणि 460 वृद्धांचा समावेश आहे. तब्बल 20,242 नागरिक विविध आजारांनी त्रस्त आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी गाझाच्या आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला आहे, कारण ते मंत्रालय हमास चालवत आहे. जो बिडेन यांच्या शंकेला उत्तर म्हणून गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने 200 पेक्षा जास्त पानांची यादी प्रकाशित केली ज्यामध्ये मृतांची नावे आहेत.