सहारनपूर : विभागीय विकासकामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस बिले देण्यात येत असलेल्या अडचणींबाबत जिल्हा स्तरावर नोटिसा जारी करून कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले गतीने दिली जावीत, यासाठी जिल्हा स्तरावर नियोजन करा अशा सूचना त्यांनी केल्या. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना मुजफ्फरनगर जिल्ह्यातील आढाव्यावेळी अटल निवासी विद्यालयाच्या कामाची प्रगती संथ असल्याबद्दल एक समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. तर शामली जिल्ह्यातील आढाव्यावेळी कैरानामध्ये पीएसी बटालियनच्या कामात उशीर होत असल्याबाबत तपासाचे निर्देश देण्यात आले.
दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्किट हाऊसमध्ये विभागीय अधिकाऱ्यांसमवेत विकास कामांचा आढावा घेतला. त्यांनी पीएम स्वनिधी योजना खूप महत्त्वपूर्ण असून त्यामध्ये अधिकाधिक फेरीवाल्यांना संलग्न करून घेतले जावे असे सांगितले. त्यासाठी कॅम्प आयोजित करून त्यांच्या पुनर्वसनाबाबत सूचना केली. मुख्यमंत्री योगी म्हणाले की, केवळ योजनांचा आढावा घेण्यापर्यंत काम मर्यादीत ठेवू नका. तर जिल्ह्यातील सर्व संबंधीत समस्यांबाबत जर काही अडचणी आल्या तर त्याबाबत थेट मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा. जर विभागीय स्तरावर बेफिकीरी आढळून आली तर कारवाई केली जाईल. यावेळी महिला कल्याण बाल विकास मंत्री बेबी रानी मौर्य, अबकारी मंत्री नितिन अग्रवाल, लोनिवी राज्यमंत्री कुंवर बृजेश सिंह, राज्यमंत्री विजय लक्ष्मी गौतम, राज्यमंत्री जसवंत सैनी, व्यावसायिक शिक्षण राज्यमंत्री कपिल देव अग्रवाल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.