कोल्हापूर : चीनी मंडी
ऊसदरात एक रकमी उचल हा शब्द कोठून आला? असा प्रश्न उपस्थित करत, साखर कारखान्याने शेतकऱ्यांना तीन हप्त्यांत पैसे देण्याची पद्धतच योग्य होती, असे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले होते. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या पवार यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले.
खासदार पवार म्हणाले, ‘एक रकमी उचल हा शब्द कोठून आला? पूर्वी हा शब्द नव्हता. कोल्हापूरकरांनी हा एक रकमी उचल शब्द आणला. पण, यापूर्वी तीन हप्त्यांत दिली जाणारे ऊस बिलच योग्य होते. कारखान्यात ऊस गेल्यानंतर पहिला हप्ता, साखर विक्री झाल्यानंतर दुसरा आणि दिवाळीत तिसऱ्या हप्त्याचे अंतिम बिल, हिच पद्धत योग्य आहे.’ गुजरातमध्ये आजही तीन हप्त्यात पैसे दिले जात असल्याचा दाखला पवार यांनी या वेळी दिला.
‘यूपीए’च्या काळात साखर उद्योगाबाबत वेगाने निर्णय होत होते. आता तशी परिस्थिती नाही, अशी खंत पवार यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘साखर उद्योगापुढे यापूर्वीही अनेकदा प्रश्न उभे राहिले आव्हाने उभी राहिली. पण, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात त्यावर तातडीने निर्णय घेऊन प्रश्न सोडवले जायचे. आता तशी परिस्थिती नाही.’ आम्ही सत्तेत असताना उसाच्या प्रश्नासंदर्भात दौरा करत असू आणि तातडीने दुसऱ्या दिवशी निर्णय जाहीर करत होतो. आता तसे होताना दिसत नाही, अशी खंत पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
उसाला पर्याय काय?
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुढे उसाशिवाय पर्याय नाही. या नगदी पिकाशिवाय कोणतेही पिक शेतकऱ्यांना तारणार नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऊस महत्त्वाचा असला तरी, त्यासाठी पाणी जास्त लागते. त्यामुळे उसाला बिटाचा पर्याय देता येईल का? या संदर्भात चर्चा करण्यासाठी आंबोली येथे विशेष बैठक बोलवण्यात आली आहे.’