हमखास परताव्याच्या हमीमुळे शेतकऱ्यांकडून ऊस पिकाला पसंती!

पुणे : निश्चित दराची हमी कमी श्रम-मेहनत, भरवशाचे पीक, विक्रीचा प्रश्न नसणे, जास्तीचे पीककर्ज उपलब्ध होणे, एका लागवडीनंतर तीन वर्षे लागवडीच्या खर्चात बचत, मजूर टंचाईवर मात करता येणे, साखर कारखान्यांनी स्वतःचे मजूर पाठवून ऊसतोडणी करून घेणे यामुळे शेतकऱ्यांकडून ऊस पिकाला अधिक पसंती दिली जाते. याचबरोबर ऊस पीक गुंतवणुकीचा जेवढा परतावा देऊ शकते, तेवढे इतर कोणतेही पीक देऊ शकत नाही. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकरीही ऊस पिकालाच पसंती दर्शवतात असे मत शेती, पाणी आणि दुष्काळ या प्रश्नांचे अभ्यासक तथा ‘द युनिक फाउंडेशन’चे वरिष्ठ संशोधक डॉ. सोमिनाथ घोळवे यांनी व्यक्त केले आहे. साखर कारखान्यांकडून ऊस लागवडीस मिळणारे संस्थात्मक प्रोत्साहन हेही यामागील एक कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात डॉ. घोळवे यांनी म्हटले आहे की, साखर कारखाने ऊस कमी पडू नये, यासाठी गावोगावी जाऊन लागवडीसाठी प्रोत्साहन देतात. नवीन जातीची शिफारस, बेणे उपलब्ध करून देणे, रासायनिक-सेंद्रिय खतांचा पुरवठा, वाढीव उत्पादनासाठी तंत्रज्ञान इ. माध्यमातून शेतकऱ्यांना थेट मदत केली जाते. त्यामुळे दुष्काळी जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईची स्थिती गंभीर असताना देखील उसाची लागवड होताना दिसून येते. याउलट कोरडवाहू पिकांबाबत शासनाची धोरणे अनुकूल नाहीत. २०१९ मध्ये, तत्कालीन विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातील पाऊस, उसासाठी होणारा पाणी उपसा, लागवड क्षेत्र आणि साखर कारखाने यांचा अभ्यास करून अहवाल तयार केला होता.

अहवालात उसाला प्रति हेक्टर सरासरी १९६.७८ लाख लिटर पाणी लागते. हेच पाणी तेलबिया आणि डाळवर्गीय पिकांना वळवले, तर ३१ लाख हेक्टर क्षेत्राला फायदा होऊ शकतो असे नमूद केले होते. पण तेलबिया आणि डाळवर्गीय पिके उसाच्या पिकाप्रमाणे परतावा देऊ शकतील का? या प्रश्नाचे उत्तर शेतकऱ्यांना मिळत नाही. तेलबिया आणि डाळवर्गीय शेतीमालाचे प्रक्रिया उद्योग सुरू करून उसाच्या पिकाप्रमाणे उत्पन्नाचा परतावा आणि हमीभावाचे कवच देण्याचे प्रयत्न शासनाकडून करण्यात आले नाहीत. त्यामुळे तेलबिया आणि डाळवर्गीय पिकांमधली अनिश्चितता शेतकरी अनुभवत आहेत. त्यामुळे ते जोखीम घेत नाहीत, असे घोळवे यांनी म्हटले आहे.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here