गडहिंग्लज : सहप्रकल्प नसल्याने गोडसाखर कारखान्याची प्रगती झालेली नाही. साखर कारखाने केवळ साखर उत्पादनावरच टिकू शकत नाहीत. त्यासाठी काही सहप्रकल्प असण्याची गरज आहे, असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. गडहिंग्लज येथील गोडसाखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. साखरेचे दर वाढल्यास ऊसाला चांगला दर देणे शक्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
कारखान्याचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर म्हणाले की, गळीत हंगाम प्रारंभ करण्यास विलंब होत आहे. आम्ही मशिनरी दुरुस्ती करून कारखान्याला पुनर्जन्म देण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या दोन ते तीन वर्षात कारखाना कर्जाच्या गाळातून बाहेर येईल. उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पालकमंत्री मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. ॲड. दिग्विजय कुराडे यांनी आभार मानले. सतीश पाटील, राजेंद्र गड्ड्यान्नावर, संग्रामसिंह कुपेकर, प्रा. किसन कुराडे, संतोष पाटील, विद्याधर गुरवे, बाळासाहेब देसाई, हेमंत कोलेकर, प्रकाश पताडे आदी उपस्थित होते.