पुणे : गेल्या पंधरा वर्षांचा विचार केला तर ऊसाच्या एफआरपीमध्ये अनेकदा वाढ झाली. मात्र एमएसपीमध्ये जादा वाढ झालेली दिसत नाही. गेल्या पंधरा वर्षात एफआरपीमध्ये प्रती टन १,८५२ रुपयांची वाढ झाली. एमएसपीमध्ये फक्त ५०४ रुपयांची वाढ झाली. एफआरपीच्या तुलनेत एमएसपीची वाढ ही खूप कमी आहे. एमएसपीपेक्षा एफआरपीमध्ये ५० रुपयांची जादा वाढ झालेली दिसून येते. साखर कारखान्यांचे अर्थकारण मजबूत होण्यासाठी याच ‘एमएसपी’मध्ये वाढ होणे गरजेचे आहे, असे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे.
केंद्र शासनाने उसाचा प्रती टन उत्पादन खर्च १,५७० रुपये धरून एफआरपी ठरवल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या तुलनेत गेल्या पंधरा वर्षांत ऊस उत्पादन घेण्यामध्ये झालेली भरीव वाढ दिसते, त्या तुलनेत केंद्र शासनाने एमएसपीमध्ये वाढ केलेली दिसत नाही. हंगामाच्या सुरुवातीला साखरेचा दर वर्षभर स्थिर राहत नाही. साखरेचे दर एमएसपीच्या आसपासच राहिले तर याचा परिणाम साखर कारखान्यांना एफआरपी देण्यावरही होत असतो. याबाबत सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड म्हणाले की, कारखान्यांचे अर्थकारण मजबूत करण्यासाठी एमएसपीमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. एमएसपी वाढल्यानंतर शेतकऱ्यांना अधिकचा दर देण्यासाठी मदत होणार आहे, तसेच साखर कारखाने आर्थिकरीत्या सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे.