सातारा : कराड तालुक्यातील पार्ले येथील श्री महालक्ष्मी जॅगरी प्रोडक्शनच्या गुळाला चालू हंगामात उच्चांकी ६४०० रुपये दर मिळाला. कराड येथे शिवतेज ट्रेडिंग कंपनी मार्फत घेण्यात आलेल्या गुळाच्या लिलावात हा दर मिळाला. गुळाचा लिलावाची बोली लावत असताना बाजारपेठेत आलेल्या गुळाचा रंग, गोडी, टिकाऊपणा तसेच त्याची कणी या गोष्टींचा विचार केला जातो. यावर त्या मालाची प्रत ठरली जाते. त्यानुसार त्याची बोली लावण्यात येते.
गुरुवारी कराड बाजारपेठेत आलेल्या गुळाचा लिलाव करण्यात आला. यामध्ये यांच्या गुळाला उच्चांकी म्हणजे सहा हजार चारशे रुपये दर मिळाला. यावेळी बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांच्या हस्ते निखिल नलवडे यांचा सत्कार करण्यात आला. संचालक जयंतीलाल पटेल, उत्तमराव जाधव, सचिव आबासाहेब पाटील व कर्मचारी उपस्थित होते.