बीड : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जय भवानी सहकारी साखर कारखान्याने आपला ४१ वा गळीत हंगाम यशस्वी केला आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. या हंगामात कारखान्याने पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. शेतकऱ्यांचा विश्वास, शेती विभागासह सर्व कामगारांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असे त्यांनी सांगितले. यावेळी श्री क्षेत्र रामगड संस्थानचे मठाधिपती योगिराज महाराज मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
चेअरमन अमरसिंह पंडित म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीतही कारखाना हंगामात पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करू शकला. कारखान्याने शेतकरी हिताचेच निर्णय घेतले आहेत. सरकारचे धोरण शेतकरी हिताचे नसल्यामुळे शेतमालाला भाव राहीला नाही. साखरेचे भाव उतरल्यामुळे कारखानदारी अडचणीत आली आहे. तरीही आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले नाही. प्रामाणिक कामगार, संचालक मंडळ व पदाधिकाऱ्यांची साथ, शेतकऱ्यांचा विश्वासातून कारखान्याला उर्जितावस्था मिळाली आहे.
कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी सांगितले की, हंगामात ११३ दिवसांत पाच लाख पाच हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करुन चार लाख अकरा हजार चारशे पंचावन्न क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. इतर उपपदार्थांचेही विक्रमी उत्पादन झाले आहे. यावेळी व्हा. चेअरमन भाऊसाहेब नाटकर, बाजार समिती सभापती मुजीब पठाण यांच्यासह संचालक, सभासद, पदाधिकारी उपस्थित होते.