जालना : जाफराबाद तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे ३२ एकर ऊस जळाला

जालना : जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा शिवारात शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे जवळपास ३२ एकर शेतातील ऊस जळून खाक झाला. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये १४ शेतकऱ्यांचे सुमारे १३०० टन उसाचे नुकसान झाले. आग विझवण्यासाठी २०० गावकऱ्यांचा प्रयत्न सुरू होता. परंतु, वाऱ्यामुळे आगीचा भडका वाढत गेला. उसाबरोबरच शेतात पाणी देण्यासाठी टाकलेले पाइपही जळून खाक झाले आहेत.

आगीमध्ये अण्णासाहेब भोपळे, शिवाजी भोपळे, गणेश भोपळे, पंढरीनाथ भोपळे, प्रल्हाद भोपळे, उमेश भोपळे आदींसह अनेकांचे नुकसान झाले. आगीत उस जळाल्याचे समजताच पैनगंगा साखर कारखाना धाड येथील कृषी अधिकारी सुखदेव पालकर व सुखदेव भोपळे तसेच बारामती ॲग्रो कन्नडचे कृषी अधिकारी पवन इंगोले यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. ऊसतोडीसाठी ऊसतोड कामगारांच्या टोळ्या मागविले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वीही हनुमंतखेडा शिवारात १०० एकर ऊस जळून खाक झाला होता. सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी वैतागले आहेत. परिसरातील क्षेत्रात वीजवितरण कंपनीने विद्युत तारा व पोलची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here