जालना : दरवर्षी पश्चिम महाराष्ट्र आणि साखर पट्ट्यात ऊस तोडणी मजूर गळीत हंगामादरम्यान कामाला येतात. ग्रामीण भागातील मजुराच्या हाताला सतत काम मिळत नसल्याने हे मजुर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्रभर फिरतात. मजूर टंचाईमुळे त्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. गळीत हंगाम महिना, दीड महिन्यावर आल्याने आता मजुरांशी करार सुरू आहेत. या भागात यंदा पोळा, महालक्ष्मी सणासाठी ऊस तोड कामगारांना ३० ते ४० हजार रुपये उचल देऊन एक लाख दहा हजार रुपयांना कोयता बांधण्यात आला आहे.
या भागातील ऊस तोडणी मजूर सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात पाच ते सहा महिण्यासाठी आपले बिऱ्हाड सोबत घेऊन जातात. ऊसतोड कामगारामध्ये दोन प्रकारचे कामगार आहेत. गाडीवान कामगार आणि कोयता कामगार गाडीवान कामगार हे आपल्या स्वतःच्या बैलगाडीसह कारखान्याच्या साईटवर रहातात. आणि कारखान्याच्या जवळच्या ऊसतोडला आपल्या गाडीत वाहुन आणतात. दुसऱ्या प्रकारचे जे मजुर आहेत ते कोयता या नावाने प्रसिध्द आहेत. हे मजुर कारखान्यापासून २५ किलोमिटरच्या अंतरावर राहतात आणि कारखान्याला ऊस पुरवतात. विरेगाव परिसरातील तांडा वाडी वस्ती गावातील कामगार सतत हाताला काम मिळत नसल्याने हे कामगार पाच ते सहा महिने पर जिल्ह्यात ऊस तोडणीचे काम करतात. त्यांना मुकादमाकडुन तीन टप्प्यात रक्कम दिली जाते. कारखान्याचे बॉयलर दसऱ्याच्या सणाला पेटत असून दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मोळीचे उदघाटन केले जाते.