जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना युनिट नं. १ च्या गळीत हंगामाची सांगता झाली. कारखान्याने २०२४-२५ च्या गळीत हंगामातील ११४ दिवसांमध्ये ८ लाख २० हजार ८३९ मे. टन उसाचे गाळप करून ५ लाख ३० हजार ३३१ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. अंदाजित सरासरी साखर उतारा ११.०१% मिळाला. तसेच, कारखान्याचे युनिट नं.२ (सागर) तीर्थपुरीच्या हंगामात ३ लाख ७९ हजार ०३० मे. टन उसाचे गाळप होऊन २ लाख ८५ हजार १७० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.

युनिट नं. १ व २ मिळून एकूण १२ लाख मे. टन गाळप होऊन एकूण ८ लाख १५ हजार ५०१ क्विंटल साखर उत्पादन झाले. डिस्टिलरी प्रकल्प युनिट नं. १ कडे २ कोटी ३२ लाख २४ हजार २१९ लिटर अल्कोहोल व २ कोटी १८ लाख ३९ हजार ३४२ लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले. युनिट नं.२ कडे ९२ लाख १७ हजार २५० लिटर अल्कोहोल व ७९ लाख ५६ हजार ००४ लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले. दोन्ही डिस्टिलरी प्रकल्प अद्याप सुरू आहेत. कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पामध्ये ११७ दिवसांमध्ये ४ कोटी ५२ लाख २८ हजार युनिट वीजनिर्मिती झाली. पुढील गळीत हंगाम २०२५-२६ करिता कारखाना कार्यक्षेत्रात २० ते २५ लाख मे. टन ऊस उपलब्धतेचा अंदाज आहे. पुढील हंगामातही अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न असल्याने लवकरच ऑफ सिझनच्या कामास प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. ऑक्टोबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होण्याच्या दृष्टीने ऑफ सिझन कामाचे नियोजन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here