जालना : अंबड आणि घनसावंगी या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनात आणि साखर कारखान्यांनी गाळप प्रक्रियेत चांगली कामगिरी बजावली आहे. हंगामात तालुक्यात जवळपास १० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे. अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे दोन्ही युनिट्स ऊस गाळपात आघाडीवर आहेत. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील विविध कारखान्यांनी मिळून या हंगामात एकूण आजपर्यंत ९ लाख ८६ हजार ५४४ मेट्रिक टन ऊसाचे गाळप यशस्वीपणे पूर्ण केले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे.
कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्याचे मुख्य युनिटने ४ लाख १८ हजार मेट्रिक टन तर तीर्थपुरी येथील सागर कारखान्याने २ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप यशस्वीपणे पूर्ण केले. दोन्ही युनिट्स मिळून ६ लाख १८ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करून भरारी घेतली आहे. देवी दहेगाव येथील समृद्धी साखर कारखान्याने २४ जानेवारीपर्यंत २ लाख ९८ हजार ५४४ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. कंडारी अंबड येथील ब्लू सफायर फूड प्रोसेसिंगने ७० हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केले आहे. यंदाच्या हंगामात चांगल्या पावसामुळे उसाचे उत्पादन वाढले असले तरी, शेतकऱ्यांना दराबाबत चिंता आहे. शेतकरी साखर कारखान्यांकडून उसाला योग्य दर मिळवण्याची अपेक्षा आहे.