जालना : शेतकरी सभासद आणि कामगारांच्या कष्टातून रामनगर सहकारी साखर कारखाना उभा राहिलेला आहे. मात्र, जालना-नांदेड नियोजित समृद्धी महामार्गाची दिशा बदलून रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीतून तो जात आहे. भविष्यात सुरू होणाऱ्या या कारखान्याचे अस्तित्व यामुळे कायमस्वरूपी संपुष्टात येणार आहे. हा महामार्ग कारखाना वगळून बनवा, अशी मागणी रामनगर सहकारी साखर कारखाना कृती समितीने पत्रकार परिषदेतून केली.
यावेळी समितीचे पदाधिकारी अरुण वझरकर, लक्ष्मण राजेशिंदे, नारायण वाढेकर, प्रल्हाद हेकाडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पदाधिकारी म्हणाले, की हा कारखाना दहा हजार शेतकरी व कामगारांच्या कष्टातून उभा राहिलेला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी अत्यल्प दरात जमिनी दिल्या. मात्र, स्थानिक आमदार आणि माजी आमदाराने वैयक्तिक लाभापोटी जालना-नांदेड नियोजित समृद्धी महामार्गाची दिशा बदलून ती कारखान्याच्या हद्दीतून केली आहे. यामुळे महामार्गाची लांबी सहा कि.मी. ने वाढली असून, दोन उड्डाणपूलही वाढले आहेत. दरम्यान, समृद्धी महामार्ग कारखान्याच्या हद्दीतून न जाता पूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार व्हावा. आमची मागणी मान्य न झाल्यास पुढील महिन्यात कारखान्याच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांची सभा घेतली जाणार असल्याचेही अरुण वझरकर यांनी सांगितले.