जालना : जालना जिल्ह्यातील कही साखर कारखान्यां हंगाम सुरू झाल्याने या कारखान्यांच्या ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या दाखल झाल्या. यंदा मोठ्या प्रमाणात यंत्राच्या साहाय्यानेही ऊसतोडणीचे काम सुरू झाले आहे. साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाल्याने शेतात ऊसतोडणीचे काम सुरु झाले आहे. परंतु कारखान्याचे गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटूनही अद्यापर्यंत ऊस दराचे घोगडे भिजतच आहे. साखर कारखान्यांकडून गाळप गतीने सुरू असले तरी अद्याप ऊस दर जाहीर झालेला नाही. साखर कारखानदारांनी चांगला दर देण्याची मागणी शेतकऱ्यांची होत आहे.
अंबड, घनसावंगी तालुक्यात गेल्या एक महिन्यांपासून ऊस गळीत हंगाम सुरु झाला आहे. ज्या शेतकऱ्यांचा खोडवा ऊस लवकर गेला, त्या शेतकऱ्यांनी रब्बीतील गहू किंवा हरभऱ्याचे पीकाची पेरणी केली आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांबरोबरच इतर कारखाने येथील ऊस मिळविण्यासाठी स्पर्धा करताना दिसतात. आपल्या भागातील कोणता कारखाना किती रुपयाचे पहिले ऊस बील काढतो याकडे इतर कारखानदार लक्ष ठेवून असतात. पहिले ऊस बील कोण व किती रुपयांनी काढतो यावर इतर कारखानदार आपल्या कारखान्याचा ऊस दर ठरवत. मात्र, यंदा गळीत हंगाम सुरू होऊन महिना उलटूनही अद्यापपर्यंत ऊस दराची कोंडी फुटलेली नाही. या ऊस दराच्या घोषणेकडे शेतकरी आतुरतेने वाट बघतो आहे.