राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम : राजू शेट्टींसह सुमारे अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग ९ तास रोखल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सुमारे अडीच हजार कार्यकर्त्यांवर शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे अंमलदार निलेश कांबळे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

मागील हंगामातील उसाला प्रति टन १०० रुपये व चालू हंगामात तुटणाऱ्या उसाला ३५०० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यात आंदोलन सुरु केले होते. राजू शेट्टी यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील प्रत्येक कारखान्यावर ‘आक्रोश पदयात्रा’ही काढली होती. याबाबत जिल्हा प्रशासन, साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्या तीन बैठका झाल्या होत्या आणि तिन्ही बैठका निष्फळ ठरल्या होत्या. त्यामुळे शेट्टी यांनी 23 नोव्हेंबर रोजी  हजारो कार्यकर्त्यांसह पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले होते. हे आंदोलन सुमारे नऊ तास सुरू होते. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

याप्रकरणी माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम पाटील, अरुण माळी, राहूल पाटील, जनार्दन पाटील, स्वस्तिक पाटील, अशोक ऐतवडे, शरद पाटील, बंडू पाटील, सागर मादनाईक, अजित पोवार, शाहरुख पेंढारी, अनिल चव्हाण यांचेसह सुमारे अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here