कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रती टन ५,००० रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जनआक्रोश पदयात्रा काढली जाणार आहे. १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत ही पदयात्रा असेल, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. साखर कारखानदारांनी वजनकाटे ऑनलाईन करावेत, दुधाला ६० रुपये हमीभाव मिळावा आदी मागण्याही संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत.
सांगलीतून सुरू होणारी पदयात्रा २२ दिवसांत ६०० किलोमीटर अंतर पार करेल. दररोज २५ किलोमीटर अंतर कार्यकर्ते चालतील. उसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. त्या खर्चानुसार यंदाचा ऊसदर पदरात पाडून घेणे, वजन काटे ऑनलाईन करणे, तोडणीसाठी द्यावे लागणारे पैसे बंद करणे, साखर उताऱ्यातील घोळ थांबवणे या मागण्या प्रामुख्याने मांडल्या जाणार आहेत.